आशेचा दीपस्तंभ : अथर्व विजय Yelmalle यांची प्रेरणादायी यशोगाथा
![]()
आशेचा दीपस्तंभ : अथर्व विजय Yelmalle यांची प्रेरणादायी यशोगाथा
विशेष प्रतिनिधी (दिनेश कुमार टाक)
सातत्य, प्रेम, अपार कष्ट आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर आयुष्याला नवी दिशा देता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अथर्व विजय Yelmalle. अवघ्या १८ वर्षांचा अथर्व आज केवळ स्वतःच्या यशाचा शिल्पकार ठरलेला नाही, तर असंख्य पालक, विशेष गरजा असलेली मुले आणि समाजासाठी आशेचा दीपस्तंभ बनला आहे.
चार वर्षांचा असताना अथर्वला ऑटिझम असल्याचे निदान झाले. अनेक कुटुंबे जिथे खचून जातात, तिथे अथर्वच्या आईने परिस्थिती स्वीकारून लढा दिला. त्यांनी स्वतः स्पीच थेरपीचे प्रशिक्षण घेतले आणि घरीच नियमित थेरपी सत्रे सुरू केली. या अथक प्रयत्नांचे फलित एका वर्षातच दिसू लागले आणि अथर्व संवाद साधू लागला.
सिंगापूरमध्ये वास्तव्यास असताना कथा सत्रे, कम्युनिटी सेंटरमधील स्विमिंग, स्केटिंग, ड्रॉइंग, योगा, उद्याने आणि सामाजिक उपक्रमांमुळे अथर्वचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास घडत गेला. मात्र भारतात परतल्यानंतर शिक्षणाचा प्रवास खडतर ठरला. ICSE बोर्डच्या अटी, शॅडो टीचरची सक्ती, शिक्षकांची सतत बदलती व्यवस्था, आर्थिक ताण आणि शाळांचा असहकार — या साऱ्यामुळे कुटुंब मानसिकदृष्ट्या थकले. अखेरीस त्यांनी एक धाडसी व दूरदृष्टीचा निर्णय घेतला — एक वर्ष पूर्ण विश्रांती, अभ्यासाचा कोणताही ताण न घेता केवळ आनंद, खेळ, निसर्ग आणि मन:शांती यांवर लक्ष केंद्रित केले.
यानंतर ठाण्यातील Child N You School हा अथर्वच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. अथर्वच्या आईने दोन वर्षे ठाण्यात राहून त्याच्या शिक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. येथे त्याच्या वागणुकीत आणि आत्मविश्वासात लक्षणीय बदल झाला. NIOS मार्गे A–B लेव्हल पूर्ण करताना फायरलेस कुकिंगसारखी उपयुक्त कौशल्ये आत्मसात केली. पँडेमिक काळातही त्याने ऑनलाइन शिक्षण सहजतेने स्वीकारले.
यानंतर अथर्वने Bonny High School (State Board) मध्ये इयत्ता ९वी व १०वीत प्रवेश घेतला. हा क्षण ऐतिहासिक ठरला, कारण प्रथमच त्याने शॅडो टीचरशिवाय नियमित वर्गात बसून शिक्षण घेतले. शिस्त, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर त्याने ओरल परीक्षा दिल्या, असाइनमेंट्स स्वतःच्या हस्ताक्षरात पूर्ण केल्या आणि दहावीची परीक्षा ७४% गुणांसह यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.
या महत्त्वाच्या टप्प्यावर रायगड जिल्हा परिषद अंतर्गत समग्र शिक्षा उपक्रमातील समावेशीत शिक्षण समूहात कार्यरत असलेले विशेष शिक्षक (Resource Teacher) श्री. दत्तू कांबळे सर यांचे मार्गदर्शन अथर्वसाठी मैलाचा दगड ठरले. त्यांनी अथर्वच्या क्षमतेकडे ‘अडचण’ म्हणून नव्हे, तर ‘संभावना’ म्हणून पाहिले. विषय योजना समजावून देणे, बोर्ड परीक्षेच्या प्रक्रियेबाबत योग्य दिशा देणे आणि अथर्ववर दाखवलेला विश्वास — यामुळे त्याच्या शैक्षणिक वाटचालीला ठोस दिशा मिळाली.
दहावीनंतर अथर्वच्या आईने Purnatva Foundation ची स्थापना केली, जेणेकरून अथर्वला घरच्या वातावरणात मित्र, उपक्रम आणि सामाजिक सहभाग मिळावा. हे केंद्र सलग दोन वर्षे यशस्वीपणे चालले.
पनवेलला स्थलांतरानंतर अथर्वने छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU), शेडूंग येथे Diploma in Hotel Operations या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आणि तो 7.3 CGPA सह यशस्वीरीत्या पूर्ण केला. सध्या तो B.Sc. Hospitality Studies चे शिक्षण घेत असून Mann Organisation येथे जॉब ट्रेनिंगद्वारे व्यावसायिक कौशल्ये, जबाबदारी आणि स्वावलंबन शिकत आहे. सार्वजनिक वाहतुकीने स्वतंत्र प्रवास करण्याचे प्रशिक्षण ही त्याच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारी मोठी पायरी ठरत आहे.
या संपूर्ण प्रवासात अथर्वचे वडील श्री. विजय Yelmalle यांनी शांतपणे, संयमाने आणि प्रेमाने दिलेला आधार अमूल्य ठरला आहे.
आज अथर्व हा शांत, संयमी, मैत्रीपूर्ण, नियमपालक, भावनिकदृष्ट्या परिपक्व, क्रीडाप्रेमी आणि कष्टाळू तरुण म्हणून उभा आहे. संघर्षातून प्रगती, शैक्षणिक यश, व्यावसायिक कौशल्ये आणि स्वावलंबनाकडे घेतलेली पावले — ही त्याची यशोगाथा प्रत्येक विशेष गरजा असलेल्या मुलासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी प्रेरणास्थान आहे.
दिव्यांग दिनानिमित्त Sopan Autism Centre यांनी अथर्व विजय Yelmalle यांची ‘Role Model’ म्हणून निवड केली आहे. त्याची कहाणी समाजाला एकच संदेश देते —
योग्य प्रेम, प्रयत्न, संयम आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक मूल नक्कीच उजळून निघते.

