इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! , प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम?
1 min read

इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! , प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम?

Loading

इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा!

प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम?

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय व दस्त नोंदणी कार्यालय — ही तीनही अत्यंत महत्त्वाची शासकीय कार्यालये आज अक्षरशः श्वास गुदमरल्याच्या अवस्थेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. इंग्रजकालीन बांधकामातील ही सुरेख, देखणी व ऐतिहासिक इमारत बाहेरून पाहताना अभिमान वाटावा अशी आहे; मात्र आत पाऊल टाकताच नागरिकांची दमछाक सुरू होते.
भव्य प्रवेशद्वारावर स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे रुबाबदार फोटो पाहून छाती गर्वाने फुलते. परंतु याच गौरवशाली वारशामागे दडलेली वास्तवाची बाजू मात्र वेदनादायक आहे. थोडे पुढे गेल्यावर, विशेषतः पावसाळ्यात, पाण्याच्या डबक्यांतून वाट काढत पुढे जावे लागते. जुन्या प्रवेशद्वारातून आत शिरताच माणसांची धडका-धडकी सुरू होते.
याचे मुख्य कारण म्हणजे महसूल विभागाच्या कारवाईत जप्त केलेले ट्रॅक्टर, रिक्षा, ट्रॉली यांना या परिसरातच डम्पिंग ग्राउंडसारखे दाटीवाटीने उभे करण्यात आले आहे. त्यातच प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या वाहनांनी जागा कोंडल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिणामी, तीन अत्यंत महत्त्वाची कार्यालये असूनही येथे मोकळेपणाने चालणेही कठीण झाले आहे.
तालुकाभरातून येणारे नागरिक, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, तसेच निवेदने देण्यासाठी येणारे मोर्चे व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी — यामुळे या कार्यालयात प्रवेश करणे म्हणजे श्वास रोखून पुढे जाणे अशी अवस्था निर्माण झाली आहे. कार्यालयाच्या आत स्वच्छतेचा अभाव, बसण्यासाठी योग्य जागेचा तुटवडा, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसणे यामुळे नागरिक प्रचंड गैरसोयीला सामोरे जात आहेत.
एकेकाळी प्रशासनाचा अभिमान असलेली ही इमारत आज एखाद्या निबिड अरण्यातील छोट्याशा गावाच्या चावडीसारखी भासू लागली आहे, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे केवळ नाराजी व्यक्त न करता, कार्यालय प्रमुखांनी आपल्या अखत्यारीतील मोकळ्या जागांचा उपयोग करून जप्त वाहने इतरत्र हलवावीत व नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी ठाम अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी व्यक्त केली आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का, की नागरिकांचा हा श्वासकोंड असाच सुरू राहणार — हा प्रश्न अमळनेरकरांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *