शिरुडच्या दोन तरुणांची भारतीय संरक्षण दलात घवघवीत निवड; अभ्यासिकेत सन्मान सोहळा
![]()
शिरुडच्या दोन तरुणांची भारतीय संरक्षण दलात घवघवीत निवड; अभ्यासिकेत सन्मान सोहळा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिका येथील दोन होतकरू तरुणांची भारतीय संरक्षण दलामध्ये निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झालेल्या कल्पेश माधवराव पाटील तसेच लष्कराच्या आयुध विभागात निवड झालेल्या धीरज भुरीलाल वैराळे यांचा अभ्यासिकेतर्फे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर या तरुणांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या सन्मान सोहळ्याचे आयोजन अभ्यासिकेचे समन्वयक डी. ए. धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलीस संतोष नारायण पाटील, माधवराव बळीराम पाटील, पंकज भिला पाटील, भुरीलाल पितांबर वैराळे यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना संतोष पाटील म्हणाले की, आजचा तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकत असताना शिरुडमधील तरुण अभ्यासिकेत नियमित अभ्यास करून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
सत्काराला उत्तर देताना कल्पेश पाटील यांनी सांगितले की, प्रामाणिक कष्ट, अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे अशक्य नाही. दिवसा शेतीची कामे आणि रात्री अभ्यास करून मी हे यश संपादन केले. आई-वडील, गुरुजन आणि अभ्यासिकेचे मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले.
गावातील तरुणांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करून विविध क्षेत्रांत आपले नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात डी. ए. धनगर यांनी सांगितले की, सध्याच्या काळात बेरोजगारी मोठी समस्या आहे. मात्र स्पर्धा परीक्षा हे असे क्षेत्र आहे की, अतिरिक्त भांडवल न घालता नोकरी मिळवता येते आणि कुटुंबाचा भविष्यकाळ उज्ज्वल करता येतो. तरुणांनी कट्ट्यांवरील गप्पा आणि मोबाईलपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मन, मेंदू आणि मनगट मजबूत असेल तर यश तुमच्यापासून कोणीही हिरावू शकत नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत पाटील, मयूर पाटील, स्वप्नील पाटील, कल्पेश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, विशाल कासार, जयेश महाजन, अंकित महाजन आदींनी विशेष परिश्रम घेतले.

