‘बोली जगवा, बोली वाचवा!’ — मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त धुळ्यात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन
1 min read

‘बोली जगवा, बोली वाचवा!’ — मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त धुळ्यात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन

Loading

‘बोली जगवा, बोली वाचवा!’ — मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त धुळ्यात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन

धुळे प्रतिनिधी :
बोली जगवा, बोली वाचवा! भाषा वाचवा, संस्कृती टिकवा! या प्रभावी संदेशासह मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६ निमित्त महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘बोलींचा जागर’ हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मराठी भाषा ही केवळ एकच भाषा नसून ती विविध प्रादेशिक बोलींनी नटलेली, समृद्ध आणि सांस्कृतिक वारशाने परिपूर्ण आहे. या बोलींच्या जतन, संवर्धन व संरक्षणासाठी शासनस्तरावरून विशेष प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यात प्रचलित असलेल्या अहिराणी व गुर्जर बोलींच्या संवर्धनासाठी ‘बोलींचा जागर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात अहिराणी बोलीवर प्रा. वा. ना. आंधळेमा. श्री. रमेश बोरसे, तर गुर्जर बोलीवर प्रा. डॉ. सुधाकर चौधरीमा. श्री. विलास पाटील हे नामवंत अभ्यासक आपले अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत. बोलीभाषांचे साहित्य, इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक काळातील महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून मा. डॉ. उदय सामंत (मंत्री, मराठी भाषा व उद्योग, महाराष्ट्र राज्य), मा. डॉ. किरण कुलकर्णी (सचिव, मराठी भाषा विभाग) व मा. अरुण गिते (भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य) लाभले आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. बी. पाटील (अध्यक्ष, का. स. वाणी, म.प्र.अ. संस्था, धुळे व माजी कुलगुरु, उमवि जळगाव) राहणार असून प्रा. डॉ. वंदना महाजन (संचालक, का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. शोभा शिंदे (सचिव, का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान, धुळे) काम पाहणार आहेत.

मराठी भाषेच्या विविध बोलींचे महत्त्व अधोरेखित करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास भाषाप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *