गांधली येथे एनएसएस विशेष शिबिरात समाजकार्याची ऊर्जा ; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व रोटरी सदस्यांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद
![]()
गांधली येथे एनएसएस विशेष शिबिरात समाजकार्याची ऊर्जा ; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व रोटरी सदस्यांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद
अमळनेर प्रतिनिधी
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन गांधली येथे उत्साहात सुरू आहे. या शिबिराला अमळनेर नगरपरिषद उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच रोटरी क्लब ऑफ अमळनेरच्या सदस्यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या समाजोपयोगी कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
गांधली येथील दत्त मंदिर परिसरातील शिबिरस्थळी उपस्थित मान्यवरांनी एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत गावात सुरू असलेल्या अभ्यासक्रमाशी निगडित उपक्रम, स्वच्छता, आरोग्य, जनजागृती व सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत समाजकार्याच्या माध्यमातून गावविकास साधण्यासाठी सातत्याने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी गांधलीचे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील, रोटरी क्लब ऑफ अमळनेरचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी, सचिव आशिष चौधरी, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजित भांडारकर, डॉ. दिलीप भावसार, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, कीर्तीकुमार कोठारी, अजय रोडगे, मौजी बग्गाजी, रोहित शिंघवी, ऋषभ पारक, राजु भेदमुत्ता, महेश पाटील, डॉ. राहुल मुटे, डॉ. शरद बाविस्कर, मनोज पाटील, यश पाटील, ओम भांडारकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.
रोटरी क्लब ऑफ अमळनेरच्या सहकार्याने शिबिरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, गरजूंना कपडे वाटप, तसेच आरोग्य शिबिराचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजाशी जोडण्याची संधी मिळत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. डॉ. अनिता खेडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. धनराज ढगे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सक्रिय सहभाग घेत आहेत.

