युवकाला ज्ञानाची, प्रगल्भ विचाराची व विवेकाची गरज आहे-स्वामी विवेकानंद
1 min read

युवकाला ज्ञानाची, प्रगल्भ विचाराची व विवेकाची गरज आहे-स्वामी विवेकानंद

Loading

युवकाला ज्ञानाची, प्रगल्भ विचाराची व विवेकाची गरज आहे-स्वामी विवेकानंद

भारतात आस्तिक व नास्तिक या दोन्ही विचारधारा निर्माण झाल्या. आस्तिक विचारधारेमध्ये कर्मकांडाने व मूर्तिपूजेने थोतांड निर्माण होऊन मानवतावादी तत्त्वज्ञान लयास गेले. नास्तिक तत्त्वज्ञान याबद्दल लोकांची धारणा वेगळी झाली. विवेकवादावर उभे असलेले नास्तिक दर्शन चार्वाक, बुद्ध व महावीर यांच्यानंतर बरेच वर्ष चालले. आस्तिक विचारधारा ज्या पद्धतीने विकसित व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने झाली नाही. त्यामुळे सर्वच धर्मांना सुधारण्याची गरज आहे असे विवेकानंदांनी म्हटले आहे. जो धर्म मानवता उभी करू शकत नाही तो धर्म नाही. धर्माने युवक जागरूक झाला पाहिजे परंतु तो झाला नाही. विवेकानंदांनी युवकाची व्याख्या जो तेजस्वी आहे, तपस्वी आहे आणि तत्पर आहे त्याला युवक म्हणता येईल.जो कोणत्याही प्रसंगातून तरुण जाऊ शकतो त्यालाच युवक म्हणता येईल. आजचा युवक नीडर, निर्भय व विवेकी, चिकित्सक झाला नाही याची खंत स्वामी विवेकानंदांना होती. भारतातील धर्म सुधारण्याची व चिकित्सक विचार करणारा धर्म उभा करण्याची अपेक्षा विवेकानंदांनी व्यक्त केली. या थोर विचारवंताचा जन्म १२ जानेवारी १८६३ ला झाला. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. आईचे नाव भुवनेश्वरी देवी हे होते. विवेकानंदाचे वडील कलकत्त्यातील उच्च न्यायालयाचे वकील होते. त्यांचा इंग्लिश, बंगाली व संस्कृत भाषेचा अभ्यास होता. जरी ते आध्यात्मिक विचाराचे होते तरी ते विवेकी विचाराने जगत. आई भुवनेश्वर अत्यंत धार्मिक होती. शिवाची भक्त होती. दररोज शिवाजी पूजा करणे तिचे नित्याचे काम होते. आई शांत, निरागस, संयमी होती. विवेकानंदांचे वडील शिक्षणाबाबत जागृत होते. विवेकानंदांना लहानपणी बिले असे म्हणत असत. लहानपणी अगदी हट्टी असलेला नरेंद्र आईला प्रश्नांनी भेडसावीत असे. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण विद्यासागर महाविद्यालयांमध्ये झाले. त्यांनी कला शाखेतील इंग्रजी विषयात बी .ए केले. हायस्कूलमध्ये असताना शिक्षकांना अनेक प्रश्न विचारून अभ्यास करण्यास भाग पाडत असे. महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षण घेत असताना. इंग्रजी विषयाशी परिचय झाला. पाश्चात त्यांची तर्कशास्त्रीय विचारसरणी त्यांनी अंगी कारली. देव आहे की नाही यासाठी त्यांनी देवा बद्दल ज्ञान असलेल्या गुरूंचा शोध सुरू केला. बऱ्याच लोकांकडे गेल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास निराश झाला. अखेर एकाच प्राध्यापकांनी त्याला रामकृष्ण परमहंस यांचे नाव सुचविले. विवेकानंदाला भजने गाण्याची आवड होती. एका ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमा दरम्यान रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली. विवेकानंदांचा मुख्य प्रश्न होता देव आहे का? असेल तर तो मला कोण दाखवील? रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना देव आहे असे सांगितले. मी तुला देव असल्याचा अनुभव देईल. रामकृष्ण परमहंस हे अध्यात्मवादी होते. कर्मकांडाच्या विरोधात होते. भारतातील बुद्धांनी व पतंजली यांनी योगाची पद्धती भारतामध्ये विकसित केली. बुद्धाच्या बहुतेक ध्यानस्थ मुद्रा विविध प्रकारच्या ज्ञान देणाऱ्या पद्धती आहेत. शरीराचा व मनाचा विकास करण्याचा प्रयत्न भारतामध्ये चांगल्या पद्धतीने झाला. परंतु अनुयायी ध्याना ऐवजी कर्मकांडांमध्ये अडकले. आजच्या युवकाला दिशादर्शक ज्ञान मिळण्यासाठी तो शील संपन्न, चिकित्सक, विवेकी असायला पाहिजे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानात उच्चतम अवस्था प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे उपलब्ध आहे. गुरु रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदाला उच्चतम ध्यानावस्था शिकवली. त्यामुळे विवेकानंदाच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल झाला. ध्यान करीत असताना मनामध्ये असलेले विकृत विचार संपले व विवेकानंदाला निर्वाण अवस्था प्राप्त झाली.
‌ नियमित ध्यान केल्यामुळे विवेकानंदाला जीवनाचे सार काय आहे हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी भारतात चाललेल्या मूर्ती पूजा व रुढी परंपरा यांच्याविरुद्ध आवाज उठविला. निसर्ग हा त्याच्या नियमानुसार चालत असतो. निसर्गाविरुद्ध वागणाऱ्या लोकांना त्याच्या त्रास होतो. विवेकानंदांनी लागत होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे असे प्रतिपादन केले. स्वामी विवेकानंद हे नीडर होते. भारतात इंग्रजांचे राज्य होते. विविध राज्यातील क्रांतिकारी लोकांना पकडून नेण्याचे धाडसत्र इंग्रजांनी सुरू केलेले होते. दिल्लीच्या चांदणी चौकात विवेकानंदाच्या समोर इंग्रजांचे सैनिक आले. विवेकानंद त्यांना न घाबरता जागेवरून आलेले सुद्धा नाही. त्यांना मरणाची भीती नव्हती. त्यांचा धाडसपणा बघून इंग्रज सैनिक माघारी परतले. स्वामी विवेकानंदांनी धर्म म्हणजे मानवाच्या उन्नतीचा मार्ग आहे असे मानले. परंतु धर्म हा विवेकावर उभा नसल्याने आधी धर्म सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या देशाचा युवक हाच खरा देशाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या विचारांमध्ये शील संपन्नता, विनयशीलता, विवेकीपणा, चिकित्सक व तर्क आधारित वृत्ती नसेल तर जग रसातळाला जाईल असे त्यांचे भाकीत होते. भारतामध्ये धर्म सुधारण्याच्या अनेक चळवळी झाल्या. त्यामध्ये चार्वाक ,गौतम बुद्ध, चक्रधर स्वामी, महावीर जैन यांनी भारताला नवा विचार दिला. पुढे यांच्या अनुयायांनी कर्मकांडाकडे वाटचाल केली. विवेकानंदांनी भारतात विवेकी विचार रुजविण्याचे प्रयत्न केले. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी ,परंपरा यावर प्रहार केला. मनुवादी लोकांनी विवेकानंद मांडताना त्यांना कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून मांडले. त्यामुळे विवेकानंदाचा खरा विचार लोकांपर्यंत पोहोचला नाही. त्यांच्या अनेक साहित्याचा अभ्यास केला असता उत्कृष्ट ध्यान पद्धती व विज्ञानवादी दृष्टिकोन तसेच चिकित्सक विचार मिळू शकतो. त्यांना अपेक्षित असलेला देव म्हणजे मानवाच्या उच्चतम अवस्थेचे प्रतिक होय.
‌ नरेंद्र दत्त यांना स्वामी विवेकानंद हे नाव रामकृष्ण परमहंस यांच्याकडे दीक्षा घेतल्यावर मिळालेले आहे. युवकाने ज्ञानाच्या माध्यमातून व शरीर संवर्धन करून देशाला नवी ताकद दिली पाहिजे असे त्यांचे मत होते. विदेशामध्ये म्हणजेच अमेरिकेत जाण्याचे वेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. हिंदूवादी संघटनांनी त्यांच्यासाठी पैसा जमा केला नाही . कारण हिंदूवादी संघटना हिंदू धर्म सुधारणेच्या विचाराचे नव्हते. स्वामी विवेकानंदांनी इतर लोकांची मदत घेऊन विदेशामध्ये प्रयाण केले. विदेशातील केलेल्या भाषणात खरा धर्म कोणता आहे? धर्माची आवश्यकता काय आहे? मानवता नसलेला विचार हा धर्मच असू शकत नाही असे त्यांनी भाषणात सांगितले. विश्वातील प्रत्येक माणूस हा एकमेकाच्या भाऊ बहीण आहे हा मोठा विचार त्यांनी भाषणात मांडला. अमेरिकेत अनेक भाषणे देऊन मानवतावादी विचार लोकांना दिला. भारतात मात्र त्यांच्याबाबत योग्य माहिती साहित्यामध्ये देण्यात आली नाही. त्यामुळे विवेकानंदांनी सांगितलेला विचार जनांपर्यंत पोहचला नाही.
विवेकानंदांनी भारतातील अज्ञानाबाबत चिंता व्यक्त केली. शुद्ध आचरण, सात्विक विचार हा धर्माचा पाया आहे. युवकांनी शील संपन्न असले पाहिजे. ज्ञानासाठी झपाटून कामाला लागले पाहिजे. आजचा युवक संघर्ष करायला भीत आहे. राजकीय लोक त्याला वापरून घेत आहे. त्याला अस्मितेची जाणीव नाही. तो व्यसनाच्या अधीन झालेला आहे. त्याच्यातील स्वाभिमान जिवंत राहिलेला नाही. अशी अवस्था आजच्या युवकाची झालेली आहे. आजचा युवक शील संपन्न झाला पाहिजे तरच त्याची दृष्टी दुसऱ्याकडे पाहण्याची पवित्र असेल.. आजच्या युवकाला दिशाहीन करणारे लोक निर्माण झालेले आहे. आजच्या युवकाकडे शक्ती आहे परंतु तो आपल्या शक्तीला विसरलेला आहे. अर्जुनाप्रमाणे त्याला आपल्या शक्तीचा विसर पडलेला आहे. आजचा योग एकत्रित होत नाही, संघर्ष करीत नाही त्यामुळे त्याला योग्य दिशा मिळत नाही. राजकीय नेते या युवकाला वापरून त्याला लाचार बनविता आहे. विवेकानंदांना व्यवस्थेपुढे झुकणारा तरुण नको आहे. आज जर ह्या युवकाने ज्ञानाकडे वाटचाल केली आणि अंधश्रद्धेपासून फारकत घेतली तर आजचा युवक देशाची शक्ती बोलू शकतो.

एस एच भवरे
उपसंपादक
लेखन मंच साप्ताहिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *