व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी कल्पेश महाले यांची नियुक्ती.
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी कल्पेश महाले यांची नियुक्ती.
मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कामकाजाला अधिक वेग, परिणामकारकता आणि तळागाळापर्यंत पोहोच देण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण संघटनात्मक फेरबदल जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा व तालुका पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची दखल घेत त्यांना पदोन्नती देण्यात आली असून, नव्या व ऊर्जावान चेहऱ्यांकडे संस्थेची तसेच राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून कल्पेश महाले यांनी जिल्हा व तालुकास्तरावर संघटनेची मजबूत बांधणी करत संघटनेची ध्येय-धोरणे त्या-त्या भागात शेवटच्या पत्रकार सदस्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आणि राज्याच्या कोर टीम मध्ये सक्रिय सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
हे संघटनात्मक बदल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मुख्य संयोजक तथा राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ आणि मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी जाहीर केले आहे.
यापुढील काळात संघटनेच्या अंतर्गत विविध विंग्स च्या कार्यकारिणीत आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे अजित कुंकूलोळ व गोरक्षनाथ मदने यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या कार्यपद्धतीत गतिमानता आणणे, संघटनात्मक बळकटी वाढवणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडणे हा या फेरबदलांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
काम करणाऱ्यांना नवी संधी देणे आणि ज्या ठिकाणी मरगळ आली आहे ती झटकून टाकण्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्ष यांसह विभाग, विंग्स, जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व नेमणुकाही लवकर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा संस्थेचे संचालक गोरक्षनाथ मदने यांनी दिली आहे.

