पोलीस–पत्रकार महोत्सवात डॉ. जी. एम. पाटील व डॉ. प्रशांत शिंदे यांचा गौरव पोलीस–पत्रकार महोत्सवात सामाजिक सलोख्याचा जागर; अमळनेरमध्ये उत्साहात आयोजन
![]()
पोलीस–पत्रकार महोत्सवात डॉ. जी. एम. पाटील व डॉ. प्रशांत शिंदे यांचा गौरव
पोलीस–पत्रकार महोत्सवात सामाजिक सलोख्याचा जागर; अमळनेरमध्ये उत्साहात आयोजन
अमळनेर प्रतिनिधी :
पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पोलीस–पत्रकार महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अमळनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवातून पोलीस व पत्रकार यांच्यातील समन्वय, परस्पर विश्वास, सामाजिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचे प्रभावी दर्शन घडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री ॲड. विजय नवल पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी भूषविले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह राजकीय, प्रशासकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आधुनिक पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत राहून समाजासाठी उल्लेखनीय व निस्वार्थ सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे डॉ. जी. एम. पाटील यांना ‘आरोग्य देवदूत’ तर साई सेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत शिंदे यांना ‘आदर्श आरोग्य सेवादूत’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमुळे त्यांच्या कार्याचे समाजात कौतुक होत असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस–पत्रकार महोत्सवामुळे समाजहितासाठी कार्य करणाऱ्या विविध घटकांमध्ये संवाद, समन्वय व सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

