कळमसरे ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रम; मागासवर्गीय निधीतून समाजोपयोगी साहित्याचे वाटप
![]()
कळमसरे ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रम; मागासवर्गीय निधीतून समाजोपयोगी साहित्याचे वाटप
अमळनेर प्रतिनिधी :
कळमसरे ग्रामपंचायतीच्या वतीने मागासवर्गीयांच्या राखीव निधीतून सुमारे ७० ते ७५ हजार रुपये किमतीच्या समाजोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त अशी भांडी, खुर्च्या तसेच मंडप साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
या वाटप कार्यक्रमावेळी सरपंच श्री. जगदीशभाऊ निकम, उपसरपंच पिंटूभाऊ राजपूत, ग्रामपंचायत सदस्य श्री. दिनकर चव्हाण, लताबाई मंगल भिल, शशिकांत बडगुजर, ग्रामपंचायत कर्मचारी,
यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांसाठी साहित्य भाड्याने घेण्याचा खर्च टाळून समाजातील सर्व घटकांना एकत्रित उपयोग होईल, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजाला थेट लाभ होणार असून सामाजिक एकोपा व सहकार्याची भावना अधिक दृढ होईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कळमसरे ग्रामपंचायतीच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

