खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत वसुंधरा लांडगे यांचा दणदणीत विजय; चौथ्या टर्मची ऐतिहासिक घोडदौड
![]()
खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत वसुंधरा लांडगे यांचा दणदणीत विजय; चौथ्या टर्मची ऐतिहासिक घोडदौड..
विजयाच्या आनंदात सत्कार सोहळा; वसुंधरा लांडगे दाम्पत्य गौरवले..
अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरची त्रैवार्षिक निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असताना, विश्वस्त पदावर सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांच्या दणदणीत विजयाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. भरघोस मताधिक्याने मिळवलेला हा विजय त्यांची सलग चौथी टर्म ठरली असून, त्यांची ही विजयी घोडदौड रोखणे कोणालाही शक्य झाले नाही.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर सौ. वसुंधरा लांडगे यांच्या राहत्या घरी अभिनंदन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ ग्रेड मुख्याध्यापक श्रीराम नाना पाटील, ग्रेड मुख्याध्यापक हरीचंद्र शिवराम कढरे, श्री. व्ही. ए. पाटील, सेवानिवृत्त आदर्श केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, पत्रकार शिक्षक ईश्वर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी सहपत्नीक लक्ष्मी–नारायणाचा जोडा सौ. वसुंधरा ताई लांडगे व नानासाहेब दशरथ लांडगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना माजी केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील यांनी सौ. लांडगे यांच्या विजयामागील गमक उलगडले. “हा विजय त्यांच्या निस्वार्थ सेवाभावी वृत्तीचा, सातत्याचा आणि समाजासाठी सदैव तत्पर राहण्याच्या स्वभावाचा परिपाक आहे. कोणतेही कार्य असो—त्या कधीच नकार देत नाहीत. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन असो वा सामाजिक उपक्रम, त्या निशुल्क व निस्वार्थपणे आपले योगदान देतात. शेरोशायरी, साजेशी गीते यांची योग्य गुंफण करून त्या कार्यक्रम अधिक यशस्वी करतात,” असे त्यांनी नमूद केले.
सौ. वसुंधरा लांडगे यांनी आतापर्यंत अर्बन बँक, शिक्षक पतसंस्था, साने गुरुजी शिक्षक पतपेढी, मराठी वाङ्मय मंडळ, खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्था (जळगाव) आदी नामांकित संस्थांमध्ये संचालक पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे व सेवाभावी वृत्तीमुळेच विविध क्षेत्रांतून त्यांना सातत्याने जनसमर्थन लाभत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“यशस्वी पुरुषामागे स्त्री असते,” असे म्हटले जाते; मात्र येथे यशस्वी ‘लक्ष्मी’मागे ‘नारायण’रूपी दशरथ लांडगे नानांची भक्कम साथ आहे, असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले. अर्जुनाला श्रीकृष्णांनी जशी सारथ्याची भूमिका बजावली, तशीच नानांची साथ वसुंधरा मॅडम यांना सदैव लाभत असल्याचे उदाहरण देत त्यांनी दोघांच्या कार्यसमन्वयाचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना सौ. वसुंधरा ताई लांडगे व दशरथ नाना लांडगे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सत्कार केवळ आमचा नसून आमच्या संपूर्ण परिवाराचा आहे. हा सन्मान आम्ही आयुष्यभर स्मरणात ठेवू.”
एकूणच, सेवाभाव, सातत्य आणि समाजाशी असलेली घट्ट नाळ यामुळे सौ. वसुंधरा लांडगे यांचा हा विजय अमळनेरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

