ग्राहकांच्या सोयीसाठी कॅश काऊंटर वाढविण्याची मागणी , अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेंट्रल बँक ऑफ इंडियाला निवेदन
![]()
ग्राहकांच्या सोयीसाठी कॅश काऊंटर वाढविण्याची मागणी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेंट्रल बँक ऑफ इंडियाला निवेदन
अमळनेर प्रतिनिधी :
ग्राहक पंधरवड्याच्या निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर शाखेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अमळनेर शाखेचे व्यवस्थापक श्री. विलास पाटील यांना कॅश काऊंटर वाढविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, सदर बँकेत सध्या कॅश देवाण-घेवाणीसाठी केवळ एकच काऊंटर कार्यरत आहे. वाढती ग्राहकसंख्या लक्षात घेता, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध तसेच महिलांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत असून, त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, ग्राहकांच्या सोयीसाठी तातडीने अतिरिक्त कॅश काऊंटर सुरू करावा, अशी सूचना वजा विनंती यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्ष सौ. स्मिता चंदात्रे, महिला आयाम प्रमुख अॅड. भारती अग्रवाल, जिल्हा सचिव सतीश देशमुख, जिल्हा उपसचिव मकसूद बोहरी तसेच जिल्हा ऊर्जा प्रमुख सुनील वाघ हे उपस्थित होते.
सदर माहिती मेहराज बोहरी यांनी दिली.

