“शब्दांची धार बोथट झाली तर लोकशाही हरते!” — पत्रकार दिनी संदीप घोरपडेंचे परखड प्रतिपादन
1 min read

“शब्दांची धार बोथट झाली तर लोकशाही हरते!” — पत्रकार दिनी संदीप घोरपडेंचे परखड प्रतिपादन

Loading

“शब्दांची धार बोथट झाली तर लोकशाही हरते!” — पत्रकार दिनी संदीप घोरपडेंचे परखड प्रतिपादन

जळगांव प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हीरक महोत्सवी उपक्रमांतर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सभा, पत्रकार बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिर, सहभोजन तसेच भोजनपूर्व अभ्यासू व तज्ज्ञ वक्त्यांची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
या व्याख्यानमालेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर, जळगाव जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आणि स्पष्टवक्ते सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी “सद्यस्थितीतील पत्रकारिता” या विषयावर बोलताना संदीप घोरपडे यांनी अत्यंत परखड, विचारप्रवर्तक आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत उपस्थित पत्रकारांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. आजची पत्रकारिता संधींनी परिपूर्ण असली तरी त्या संधी ओळखण्यासाठी सजग नजर आणि समृद्ध शब्दसंग्रह आवश्यक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. शब्दांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत, शब्द हीच पत्रकाराची खरी संपत्ती असल्याचे नमूद केले.
“शब्दसंग्रह कमी होत चालल्याने लिखाण बोथट होत आहे,” अशी स्पष्ट जाणीव करून देत त्यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या लोकहितवादी परंपरेचा उल्लेख केला. वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून समाजहितासाठी पत्रकारितेचे जीवन समर्पित करण्याचा आदर्श आजही मार्गदर्शक ठरतो, असे ते म्हणाले.
पुराणातील संदर्भ देत त्यांनी श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचे रूपक वापरले आणि पत्रकारांच्या हाती ‘सप्तधारयुक्त चक्र’ देण्याची संकल्पना मांडली. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, उपजीविका आणि शिक्षण — या सात क्षेत्रांतील उणिवा निर्भीडपणे लेखणीद्वारे मांडल्यास पत्रकारितेला खरी धार प्राप्त होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सामाजिक क्षेत्रावर भाष्य करताना समाजातील नैतिक अधःपतन, वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि भ्रष्टाचाराशी झालेली समाजाची सवय यावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. आर्थिक क्षेत्रात गरीब-श्रीमंत दरी वाढत असून सर्वसामान्यांना रोजगार, प्रवास, शिक्षण महाग होत असताना भांडवलदारांची कर्जमाफी सहज होत असल्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. महागाई कळसाला पोहोचली असतानाही सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष पत्रकारांनी लेखणीद्वारे उघडे पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.
शैक्षणिक धोरणावर बोलताना त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणावर चौफेर टीका करत विज्ञानयुगाकडून समाजाला मागे नेणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केला. मराठी जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता उदोउदो यावरही त्यांनी पत्रकारांनी ठोस भूमिका घ्यावी, असे स्पष्ट केले.
राजकीय विश्लेषणात राष्ट्रपती, राज्यपाल, विधानसभा व संसद पदाधिकाऱ्यांच्या पक्षपाती वर्तनावर भाष्य करत त्यांनी राजकारणातील नैतिकतेचा ऱ्हास अधोरेखित केला. भ्रष्टाचार, पैशाचा गैरवापर आणि माध्यमांतून होणारे “जाहिरातधर्मी राजकारण” यामुळे पत्रकारितेची धार बोथट होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पूर्वी नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रीपदे जात असत, आज मात्र गंभीर आरोपांनंतरही सत्ताधाऱ्यांचे मौन दिसते, ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
अशा परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून निर्भीड, प्रामाणिक आणि लोकहितवादी पत्रकारितेतूनच समाजपरिवर्तन शक्य आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत संदीप घोरपडे यांनी आपले परखड भाषण संपवले. उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या विचारांना दाद देत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *