अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीची निर्णायक बैठक  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती
1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीची निर्णायक बैठक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती

Loading

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीची निर्णायक बैठक

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती

अमळनेर प्रतिनिधी
राज्य तसेच देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा व पुढील आंदोलनात्मक भूमिका ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या निमंत्रकांची महत्त्वपूर्ण बैठक दि. ४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता हरिकृपा बिल्डिंग, शिवाजी रोड, पनवेल (नवी मुंबई) येथे पार पडली.
या बैठकीत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ करण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करावी, प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलून तो दरमहा सरसकट लागू करावा, तसेच पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यादरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशा ठोस मागण्या मांडण्यात आल्या.
यासोबतच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविका व मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करावी, सेवावृत्तीनंतर दरमहा पेन्शन योजना सुरू करावी, तसेच मा. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना २४,८०० रुपये व मदतनीसांना २०,४०० रुपये मासिक वेतन लागू करावे, यावर बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली येथे देशव्यापी धरणे आंदोलन करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. त्यापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी तसेच आपापल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, नागपूर येथे झालेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात मुंबईतील आझाद मैदान येथे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे नियोजन करण्यावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीस श्री. युवराज बैसाणे, कु. श्रुती म्हात्रे (दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या सुकन्या), संजय मापले, रामकृष्ण बी. पाटील, अमोल बैसाणे, एकनाथ ठोंबरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *