अमळनेरचे बहुआयामी नेतृत्व वैद्यकीय सेवेपासून साहित्य-संस्कृतीपर्यंत डॉ. अविनाश रघुराज जोशी यांचे प्रेरणादायी कार्य
![]()
अमळनेरचे बहुआयामी नेतृत्व
वैद्यकीय सेवेपासून साहित्य-संस्कृतीपर्यंत डॉ. अविनाश रघुराज जोशी यांचे प्रेरणादायी कार्य
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहराच्या वैद्यकीय, सामाजिक, साहित्यिक व वैचारिक क्षेत्रात आदराने ओळखले जाणारे नाव म्हणजे डॉ. अविनाश रघुराज जोशी (एम.डी.), जोशी हॉस्पिटल, अमळनेर. गेली तीन दशके अविरत सेवा देणारे डॉ. जोशी हे केवळ यशस्वी वैद्यकीय तज्ज्ञच नव्हे, तर समाजाशी घट्ट नाते जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.
डॉ. अविनाश जोशी यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण एस.पी. कॉलेज, पुणे येथे झाले असून, वैद्यकीय शिक्षण त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून पूर्ण केले आहे. गेल्या ३२ वर्षांपासून कार्डिओ व डायबिटीस तज्ज्ञ म्हणून ते रुग्णसेवेत कार्यरत असून, ग्रामीण व शहरी भागातील हजारो रुग्णांचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून संपादन केला आहे.
वैद्यकीय सेवेसोबतच ते अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वैद्यकीय संघटनांशी संबंधित असून, विविध संघटनांचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. विविध आजारांबाबत जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण मोफत वैद्यकीय शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच विविध वैद्यकीय विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली असून, ऑनलाईन वेबिनार्स व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
डॉ. जोशी यांनी अमळनेर आय.एम.ए. (इंडियन मेडिकल असोसिएशन) चे तब्बल १५ वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे. यासोबतच गेल्या २५ वर्षांपासून ते दिल्ली येथील सेन्ट्रल कौन्सिलचे सदस्य म्हणून कार्यरत असून, अमळनेर व खानदेशातील वैद्यकीय क्षेत्राचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.
वैद्यकीय व्यवसायाबाहेरही डॉ. जोशी समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. विविध सामाजिक कार्यक्रमांत त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. विशेष म्हणजे, तरुणांना व्यवसाय, करिअर व जीवनमार्गदर्शन देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक युवकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे.
साहित्य व संस्कृती क्षेत्रातही डॉ. जोशी यांचे योगदान उल्लेखनीय आहे. गेल्या ११ वर्षांपासून महाराष्ट्रभर नावाजलेल्या ‘मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर’ चे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली साहित्यिक उपक्रमांना नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या कार्यकाळातच ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे यशस्वीरीत्या पार पडले. या भव्य संमेलनात कार्याध्यक्ष म्हणून संपूर्ण आयोजन व नियोजनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.
या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून खानदेशातील कलाकार, साहित्यिक, कवी व लोकसंगीत कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक मानले जाते.
वैद्यकीय सेवेत तज्ज्ञता, सामाजिक जाणिवा, तरुणांसाठी मार्गदर्शन आणि साहित्य-संस्कृतीसाठी निष्ठावान योगदान—या सर्व अंगांनी डॉ. अविनाश रघुराज जोशी हे अमळनेरच्या सार्वजनिक जीवनातील एक प्रेरणादायी, विश्वासार्ह व आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
खान्देश शिक्षण मंडळाच्या डॉक्टर बी एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनल मध्ये त्रिवार्षिक निवडणुकीत डॉक्टर अविनाश जोशी हे संचालक पदासाठी आपली उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे.. प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या पॅनलला सभासदांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.डॉ जोशी निवडणुकीत निश्चितच विजय होईल यात शंका नाही असे मतदारांमध्ये चर्चा आहे..

