परिट धोबी समाजाचा शैक्षणिक गौरव, डेबूजी झिंगराजी ग्रंथालयात कर्तृत्ववान शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान
![]()
परिट धोबी समाजाचा शैक्षणिक गौरव
डेबूजी झिंगराजी ग्रंथालयात कर्तृत्ववान शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान
अमळनेर प्रतिनिधी
डेबूजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक कार्यक्रमात परिट धोबी समाजातील कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पू. साने गुरुजी ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमाने समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक प्रगतीचा ठसा उमटविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. विवेकजी ठाकरे (माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य धोबी सेवा मंडळ) होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक गोपीभाऊ कासार, सुरज परदेशी, श्रीराम चौधरी, सचिन पाटील, माजी नगरसेविका सौ. कविता जाधव, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी (माजी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय), श्यामकांत भदाणे (माजी उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा बँक), प्रा. विजयसिंग पवार (मार्गदर्शक, पू. साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र), सुरेशजी ठाकरे (प्रदेश उपाध्यक्ष, सर्वभाषिक धोबी महासंघ), प्रा. राजेशजी जाधव (जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक संघटना), अरुणजी राऊत (जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा धोबी समाज), दीपकजी बाविस्कर (अध्यक्ष, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय मंडळ), गणेशजी बच्छाव (प्राचार्य, फेगडे उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद), गंगारामजी वाल्हे (तालुकाध्यक्ष, अमळनेर धोबी समाज), अविनाशजी जाधव (सामाजिक कार्यकर्ता) व संतोषभाऊ वाल्हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व इतर क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल २० आदर्श शिक्षकांना सन्मानपत्र व लेखणी देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी बजावलेल्या १२ समाजबांधवांचा आणि १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
पुरस्कृतांच्या वतीने विनोद जाधव (संचालक, जाधव क्लासेस) व बाळासाहेब निकुंभ (उपशिक्षक, सार्वे माध्यमिक विद्यालय) यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाच्या माध्यमातून समाजउत्थानाचा संदेश दिला. प्रा. विजयसिंग पवार यांनी ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले, तर प्राचार्य गणेश बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात विवेक ठाकरे यांनी परिट धोबी समाजाला एससी प्रवर्गातील आरक्षण पूर्ववत लागू करण्यासाठी लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र राज्य सकल परिट-धोबी वरठी समाज सर्वभाषिक आरक्षण समन्वय समितीच्या वतीने सुरू असलेल्या पाठपुराव्याचा आढावा मांडला.
ग्रंथालयाचे अध्यक्ष दीपकभाऊ वाल्हे यांनी कार्यक्रमाचे सुस्पष्ट प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर सचिव सौ. संगीता वाल्हे यांनी आभार मानले. यशस्वी आयोजनाबद्दल दीपकभाऊ वाल्हे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी युवा परिट धोबी मंडळ अमळनेर व पू. साने गुरुजी ग्रंथालय वाचनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. हा सन्मान सोहळा परिट धोबी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

