“आधी स्वतःचे घर सांभाळा, मग इतरांचे पाटे पाडा” – माजी आमदार शिरीष चौधरी यांचा आमदार अनिल पाटलांवर घणाघात
1 min read

“आधी स्वतःचे घर सांभाळा, मग इतरांचे पाटे पाडा” – माजी आमदार शिरीष चौधरी यांचा आमदार अनिल पाटलांवर घणाघात

Loading

“आधी स्वतःचे घर सांभाळा, मग इतरांचे पाटे पाडा” – माजी आमदार शिरीष चौधरी यांचा आमदार अनिल पाटलांवर घणाघात

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतरही शहरातील राजकारण चांगलेच तापले असून आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या भाषणशैली व दाव्यांवर जोरदार टीका करत, “आधी स्वतःचे घर सांभाळावे, मग इतरांचे पाटे पाडावेत,” असा स्पष्ट सल्ला दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी म्हणाले की, आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर शहरातील राजकीय वलय आता उरलेले नाही. निवडणूक काळातील त्यांच्या वल्गना फोल ठरल्या असून नंदुरबारमध्येही ‘पाटा पाडणार’ अशा घोषणा केवळ शब्दांपुरत्याच राहिल्या. प्रत्यक्षात अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप त्यांनी केला.
तळोदा येथील राजकीय घडामोडींवर भाष्य करत चौधरी यांनी गौप्यस्फोट केला. “तळोदा येथे माझाच भाचा निवडून आला आहे. कोकाटे यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे त्याला राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगण्यात आले. अन्यथा शिवसेनेकडूनही लढत झाली असती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चौधरी पुढे म्हणाले की, आमदार पाटील यांच्या पत्नी ज्या प्रभागातून निवडणूक लढवत होत्या, त्या प्रभागात आमच्या उमेदवाराला तब्बल ८०० मते मिळाली. त्यामुळे ‘पाटा पाडण्याचे’ दावे वास्तवाशी सुसंगत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व अपक्ष नगरसेवक एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला. नगरपालिकेत त्रिशंकू स्थिती असली तरी कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार झालेला नसल्याचे स्पष्ट करत, शिवसेना व अपक्ष नगरसेवक ठामपणे एकत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘सर्व पदे शिंदेसेनेकडेच राहणार’
पत्रकार परिषदेत चौधरी म्हणाले की, शिवसेनेत १६ आणि ६ असे दोन गट असले तरी नगरपालिकेतील सत्तास्थापन पूर्णपणे संख्याबळावर आधारित आहे. सहकार्याने शहराचा विकास साधला जाईल. नगरपालिकेतील सर्व पदे शिंदेसेनेकडेच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहकारी नगरसेवकांच्या मदतीने दरवर्षी किमान एक मोठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अमळनेरकर नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही देताना चौधरी म्हणाले की, २४ तास पाणीपुरवठा योजना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाली असून ती पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आहे. शहर विकासासाठीच्या योजना सुरू करण्यात आल्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे. करवाढ रद्द करणे व व्याज आकारणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
१ जानेवारी रोजी पदभार व विजय मेळावा यावेळी बोलताना चौधरी यांनी सांगितले की, दि. १ जानेवारी रोजी नगरपालिकेचा अधिकृत पदभार स्वीकारण्यात येणार आहे. त्याच दिवशी शहरात भव्य विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक, व्यापारी वर्ग व सर्व मतदारांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, शिवसेनेच्या अँड. ललिता पाटील, गटनेते महेश देशमुख, गटनेते साहेबराव पवार, पंकज चौधरी, प्रभाग क्रमांक १६ चे सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील यांच्यासह विजयी अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *