अमळगावची कन्या बनली ‘आरोग्यदूत’; ग्रामीण रुग्णालयाला नवे बळ दुर्लक्षित शस्त्रक्रिया विभाग पुन्हा कार्यान्वित – दोन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी
![]()
अमळगावची कन्या बनली ‘आरोग्यदूत’; ग्रामीण रुग्णालयाला नवे बळ
दुर्लक्षित शस्त्रक्रिया विभाग पुन्हा कार्यान्वित – दोन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी
अमळगाव | प्रतिनिधी
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या अमळगाव ग्रामीण रुग्णालयात अखेर सकारात्मक बदल घडू लागला आहे. अमळगावच्या कन्या आणि नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील (MBBS) यांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामीण रुग्णालयातील बंद पडलेला शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू झाला असून, याच विभागात दोन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
ग्रामीण भागातील महिलांसाठी ही मोठी दिलासादायक बाब असून, उपचारांसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज आता कमी होणार असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
*अडचणींचा डोंगर, तरीही न डगमगता घेतला पुढाकार*
डॉ. प्रांजली पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा पाहून त्या अस्वस्थ झाल्या. अनेक वर्षांपासून शस्त्रक्रिया विभाग बंद होता. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणांचा अभाव, रुग्णालयातील पाईपलाईन व पाण्याची जोडणी पूर्णपणे बंद असल्याने शौचालय व इतर मूलभूत सुविधा ठप्प होत्या.
शस्त्रक्रिया विभागासाठी पाण्याची जोडणी अत्यावश्यक असल्याने डॉ. पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत पदरमोड करून पाण्याची व्यवस्था मार्गी लावली. त्याचबरोबर शस्त्रक्रियेसाठी लागणारी काही आवश्यक उपकरणेही स्वतः उपलब्ध करून दिली. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचा चंग बांधला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
*ग्रामीण महिलांसाठी दिलासादायक निर्णय*
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण, महिला व कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे. यासोबतच छोट्या-मोठ्या गाठींची तपासणी, वैद्यकीय सल्ला व आवश्यक असल्यास शस्त्रक्रियेची सुविधाही आता ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*सहकार्याची भक्कम साथ*
या कार्यात अमळगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश पाटील, डॉ. योगेश वाणी, डॉ. दायमा, तसेच संपूर्ण परिचारिका वर्ग व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ. प्रांजली पाटील यांनी सांगितले.


*चौकट बातमी*
“यापुढे शस्त्रक्रिया विभाग नियमितपणे सुरू ठेवण्याचा माझा मानस आहे. अत्यावश्यक सेवा ग्रामीण रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी बांधिल आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर आणखी सुधारणा करून उत्तम प्रकारे रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न राहील.”
— डॉ. प्रांजली पाटील (MBBS)
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अमळगाव
*पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश*
ग्रामीण रुग्णालयातील निष्क्रिय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत *पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते भूषण चौधरी* आणि *प्रदेश तेली महासंघाचे तालुका सचिव परेश चौधरी* यांनी सातत्याने वरिष्ठ पातळीवर तक्रारी करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे निष्क्रिय नियुक्त्यांना आळा बसला आणि कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. प्रांजली पाटील यांची नियुक्ती शक्य झाली.
दरम्यान,अनेक न्यूज वृत्तपत्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हजेरीबाबतच्या तक्रारी सातत्याने बातम्यांद्वारे उचलून धरल्या होत्या.
*ग्रामस्थांकडून अभिनंदन*
अमळगाव येथील सुभाष तुळशीराम पाटील (निवृत्ती बापू) यांची कन्या व पारोळा येथील सासरवाशी असलेल्या डॉ. प्रांजली पाटील यांनी अवघ्या दोन महिन्यांत ग्रामीण रुग्णालयाला नवी दिशा दिल्याबद्दल ग्रामस्थ, रुग्ण व युवकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
समर्पित नेतृत्व आणि सेवाभावामुळे अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवेचा नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

