करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण
1 min read

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण

Loading

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण

अमळनेर प्रतिनिधी
विश्व मावेल असे विशाल हृदय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांचे होते. भगवान स्वामीनारायणांनी प्रबोधित केलेल्या अक्षर–पुरुषोत्तम उपासनेचे जगभर प्रवर्तन करणारे, ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी स्थापलेल्या बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे ते तेजस्वी प्रेरणास्थान होते. प्रेम, करुणा, त्याग आणि सेवाभाव यांचा जिवंत अवतार म्हणजेच प्रमुख स्वामी महाराज. त्यांच्या सान्निध्यात आलेला प्रत्येक जीव आपलेपणा, मायेची ऊब आणि आध्यात्मिक शांती अनुभवत असे.
अमळनेर येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा पवित्र प्राणप्रतिष्ठा विधी पौष शुद्ध द्वितीया, रविवार दिनांक ७ जानेवारी १९९६ रोजी, परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते अत्यंत मंगल वातावरणात संपन्न झाला. हा क्षण अमळनेर व संपूर्ण खान्देशच्या धार्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. त्या पावन प्रसंगाने असंख्य भाविकांच्या जीवनाला अध्यात्माची नवी दिशा दिली आणि भक्तीचा अखंड झरा प्रवाहित केला.
१९७६ ते २०२६ या कालखंडात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांचे अमळनेर व खान्देशातील वारंवार आगमन हे केवळ प्रवास नव्हते, तर भक्तांच्या जीवनात झालेले अध्यात्मिक परिवर्तन होते. प्रमुख स्वामी महाराज म्हणजे असे हृदय, ज्यात संपूर्ण विराट विश्व सामावू शकेल. जाती, धर्म, देश, भाषा यांचे सर्व भेद त्यांच्या प्रेमापाशी वितळून जात. आदिवासी असोत वा विदेशी, श्रीमंत असोत वा गरीब—प्रत्येकाच्या वेदना, चिंता आणि आशा यांच्याशी ते तादात्म्य पावून त्यांना आधार देत.
रात्र-दिवसाचा भेद न करता सतत विचरण करणारे प्रमुख स्वामी महाराज मानसिक ताणतणावांनी जखमी झालेल्या मनांना औषध ठरत. तरुणांना त्यांच्या विचारांतून गतिशीलता व रचनात्मकता लाभली, तर ज्येष्ठांना त्यांच्यात व्यवहारदक्ष, पवित्र आणि शांत पुरुषाचे दर्शन घडले. लोककल्याणाच्या असंख्य कार्यांत सतत व्यग्र असतानाही भगवंताशी अखंड नाते त्यांनी सहजपणे जपले. म्हणूनच त्यांचे दर्शन म्हणजे उत्साहाने, श्रद्धेने आणि नव्या जीवनदृष्टीने परिपूर्ण अशा शुभारंभाचा क्षण ठरे.
१३ मे १९७६ ते १७ मे १९७६ या कालावधीत खान्देश दौऱ्यावर असताना, बसने प्रवास करून रात्री दीड वाजता इंदूरहून अमळनेर येथे त्यांनी मुक्काम केला. लंडनमधील हरिभक्त दुर्गेशभाई यांच्यासह अनेक परदेशी भक्तांनीही या पवित्र भूमीचे दर्शन घेतले. २ मे १९८२ ते ८ मे १९८२ या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी खान्देशात विचरण केले. लंडनहून आलेले आठ ते दहा हरिभक्त त्यांच्या सोबत होते, ही बाब त्यांच्या वैश्विक प्रभावाची साक्ष देणारी आहे.
१६ जानेवारी १९८८ ते २० जानेवारी १९८८ दरम्यान, २४ संत व हरिभक्तांसह अमळनेर मंदिराचे भूमिपूजन त्यांनी संपन्न केले. पुढे ४ जानेवारी १९९६ ते १० जानेवारी १९९६ या काळात मुंबईतील अमृत महोत्सव आटोपून ते खान्देशात आले. धुळे येथील छात्रालयाचे भूमिपूजन करून वरखेडा व अमळनेर मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यांनी पार पाडला. प्रसंगी बैलगाडीवरूनही त्यांनी गावोगावी विचरण केले, ही त्यांची साधेपणा व सेवाभावाची विलक्षण ओळख होती.
अमळनेर, वरखेडा, धुळे, सोनगीर, जापी, मोहाडी, गलवाडा, कुसुंबा, शिरढाणे, शिरसाळा, नंदुरबार आदी अनेक गावांत जाऊन त्यांनी अक्षर–पुरुषोत्तम महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली. असंख्य भाविकांना दर्शनाचा अमूल्य लाभ देत त्यांनी खान्देशवासीयांना भक्ती, संस्कार आणि आध्यात्मिक समृद्धीची अनमोल देणगी दिली.
१९७६ ते २०२६ या कालखंडात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या अमळनेर आगमनाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत असताना, त्यांच्या स्मृती केवळ इतिहास नाहीत, तर आजही मार्गदर्शक प्रकाशस्तंभ आहेत. त्यांच्या जीवनकार्याने प्रेरित होऊन भक्ती, सेवा आणि सदाचाराच्या मार्गावर चालणे, हाच या सुवर्ण महोत्सवाचा खरा अर्थ आणि खरे यश ठरेल.

शब्दांकन :
जगदीश चौधरी
श्री स्वामीनारायण मंदिर, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *