शिक्षण व समाजसेवेची ओळख ठरलेल्या वसुंधरा लांडगे विश्वस्त पदाच्या रिंगणात
![]()
शिक्षण व समाजसेवेची ओळख ठरलेल्या वसुंधरा लांडगे विश्वस्त पदाच्या रिंगणात
अमळनेर प्रतिनिधी :
खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या २०२५–२०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत विश्वस्त पदासाठी वसुंधरा दशरथ लांडगे यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. एम.ए., बी.एड., गायन विशारद अशा शैक्षणिक पात्रतेसह त्या सध्या खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तसेच अर्बन बँक अमळनेरच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी ‘स्टूल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
उमेदवारी जाहीर करताना काढण्यात आलेल्या पत्रकात वसुंधरा लांडगे यांनी मतदार बंधू-भगिनींना आवाहन केले आहे की, “मतदानाचा आपला हक्क बजावत ‘स्टूल’ या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून मला विजयी करावे व शिक्षण व समाजसेवेची संधी द्यावी.” आपल्या कार्याच्या माध्यमातून खान्देश शिक्षण मंडळ अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
वसुंधरा ताई लांडगे या उत्कृष्ट सूत्रसंचालिका असून त्यांनी सत्यशोधक पद्धतीने अनेक विवाह सोहळे संपन्न केले आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी मानले जाते. सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त दरवर्षी पारायणासारखे उपक्रम राबवणे, विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे तसेच शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांची ठळक ओळख आहे. महिला सक्षमीकरण व मंचावरील कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
वसुंधरा ताई व त्यांचे पती दशरथ नाना लांडगे हे सर्व समाजघटकांच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी होत असल्याने त्यांना सर्वत्र आपुलकीचा मान मिळतो. त्यांच्या कार्याची दखल खान्देश शिक्षण मंडळाच्या सभासदांनी नेहमीच घेतली असून, याही निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी पुन्हा संधी दिली जाईल, अशी चर्चा सभासदांमध्ये रंगली आहे. “काम हीच ओळख” या बळावर वसुंधरा लांडगे यांचा विजय निश्चित असल्याची भावना सध्या खान्देश शिक्षण मंडळाच्या सभासदांमध्ये व्यक्त होत आहे.

