अमळनेरचे भूषण प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांना ‘सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान , राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात साहित्य-शैक्षणिक योगदानाची गौरवपूर्ण दखल
1 min read

अमळनेरचे भूषण प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांना ‘सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान , राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात साहित्य-शैक्षणिक योगदानाची गौरवपूर्ण दखल

Loading

अमळनेरचे भूषण प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांना ‘सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात साहित्य-शैक्षणिक योगदानाची गौरवपूर्ण दखल

अमळनेर प्रतिनिधी :
जळगाव येथील एम. जे. कॉलेजच्या भव्य प्रांगणात दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तिसऱ्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात अमळनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, अभ्यासू विचारवंत व ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांना त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रदीर्घ व मौलिक योगदानाबद्दल ‘सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध गझलसम्राट भीमराव पांचाळ, संमेलनाध्यक्ष डॉ. म. सु. पगारे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश बडवे, सतीश जैन आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी साहित्यप्रेमी, अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रा. डॉ. प्रभाकर जोशी हे संत साहित्य व भाषाविज्ञान या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक म्हणून परिचित आहेत. त्यांनी मराठी साहित्याला वैचारिक अधिष्ठान देणारे अनेक ग्रंथ लिहिले असून ‘वचनामृत’, ‘भागवत’, ‘कथापुराण साहित्य’, ‘विचार-वर्णनात्मक भाषाविज्ञान’ यांसारखे त्यांचे ग्रंथ अभ्यासकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या लेखनातून परंपरा, तत्वज्ञान व आधुनिक विचार यांचा सुंदर संगम दिसून येतो.
याशिवाय अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळाच्या उभारणी व संवर्धनात त्यांनी दिलेले योगदान सर्वमान्य असून, अनेक पिढ्यांना साहित्यिक प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाने व प्रभावी अध्यापनाने मराठी भाषेच्या समृद्धीत मोलाची भर घातली आहे.
..या प्रतिष्ठित सूर्योदय जीवन गौरव पुरस्काराच्या प्राप्तीमुळे अमळनेरच्या साहित्यिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतून प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *