साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे बासरी वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न
1 min read

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे बासरी वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न

Loading

 

 

 

 

 

 

 

 

 

 

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे बासरी वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी :
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बासरी वादन कार्यशाळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेस ज्येष्ठ बासरीवादक पंडित विवेक सोनार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. लोकसहभागातून उपक्रम राबवून त्यातून रचनात्मक कार्य उभे करणे हे जरी आव्हानात्मक असले, तरी साने गुरुजी यांच्या विचारांवर विश्वास ठेवून असे कार्य पुढे नेले पाहिजे, असे प्रतिपादन पंडित विवेक सोनार यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. साने गुरुजी यांच्या विचारांचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव असल्याचे नमूद करताना त्यांनी, “हृदयात प्रेम असेल तर बासरीतून सप्तसुरांची उधळण होते. स्वर माणसाला आनंदी करतात आणि माणसांवर, निसर्गावर तसेच प्राण्यांवर प्रेम करायला शिकवतात,” असे भावस्पर्शी विचार मांडले.

या कार्यशाळेत खान्देशासह महाराष्ट्राच्या विविध भागांतील संगीतप्रेमी सहभागी झाले होते. चोपडा येथून १२, एरंडोल येथून १०, जळगाव येथून १५, शहादा येथून ७, पुणे येथून ४ तसेच अमळनेर येथून १६ सहभागी उपस्थित होते. विविध भागांतून आलेल्या या सहभागींमुळे कार्यशाळेला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले होते. बासरी वादनाच्या तांत्रिक बाबी, श्वसन पद्धती, स्वरांची शुद्धता आणि संगीत साधनेतील आत्मिक आनंद याविषयी पंडित विवेक सोनार यांनी सखोल व प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक दर्शना पवार यांनी केले. यावेळी त्यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या उभारणीसाठी लोकसहभागातून मिळणारा पाठिंबा आशादायी असल्याचे सांगितले. सरकारची या विषयातील उदासीनता खंतजनक असली, तरी लोकसहभागाच्या बळावर हे कार्य पुढे जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. पंडित विवेक सोनार यांचे स्वागत चेतन भोई, शुभम पवार, दीपक लांबोळे, सुवर्णा खराडे व अश्विनी वाघमोडे या तरुणांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोपाळ नेवे, सचिन पाखले, दर्शना पवार, चेतन भाऊ सोनार, किशोर महाजन, तुषार पाटील व डॉ. अतूल चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य अ. गो. सराफ यांनी दूरध्वनीवरून पंडित विवेक सोनार तसेच बासरी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. “तुमच्या सप्तसुरांनी सारे जग प्रेममय व्हावे,” अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संगीत, प्रेम व माणुसकीचा संदेश देणाऱ्या या बासरी वादन कार्यशाळेने उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ टिकणारी छाप उमटवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *