मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट* *साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार*
![]()
*मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट*
*साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार*
*अमळनेर* ः संपूर्ण भारताचा अभिमान असलेले ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरजजी चोप्रा यांनी 16 जानेवारी 2025 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने कु. हिमानी मोर यांच्याशी विवाह केला. फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत, कोणताही दिखाऊपणा न करता व हुंडा नाकारून केवळ 1 शगुन स्वीकारत केलेला हा विवाह भारतीय संस्कृती, मूल्ये व कुटुंबव्यवस्थेचे उदाहरण ठरला आहे. या पार्श्वभूमीवर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने सोमवार, दि. 15 डिसेंबर रोजी नीरजजी चोप्रा यांच्या पानिपत (खंद्रागाव) येथील निवासस्थानी जाऊन कुटुबियांची भेट घेऊन सत्कार केला. तब्बल 1 हजार 141 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मंदिर संस्थेने थेट घरी जाऊन केलेला हा सत्कार देशातील पहिलाच उपक्रम असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या सत्कारासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकण, सेवेकरी श्री. दत्तात्रय पवार, सेवेकरी श्री. आशिष चौधरी यांनी पानिपत येथे नीरज चोप्रा यांच्या कुटुबीयांची भेट घेतली. याप्रसंगी नीरजजी चोप्रा यांचे आजोबा धर्मसिंग चोप्रा व काका सुरेंद्रजी चोप्रा यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सुरेंद्रजी चोप्रा यांनी सांगितले, की अठरा वर्षांपूर्वी मी स्वतः पाच जणांच्या उपस्थितीत केवळ एक रुपया शगुन घेऊन विवाह केला होता. त्या वेळी समाजाकडून मोठा विरोध सहन करावा लागला. मात्र, नीरजने हीच परंपरा पुढे नेत समाजासमोर आदर्श पायंडा घातला आहे.
साधेपणा, शेती आणि मूल्यांची जपणूक
या भेटीदरम्यान उपस्थित सेवेकऱ्यांनी चोप्रा कुटुंबीयांचा अनुभव कथन करताना सांगितले की, जागतिक कीर्ती मिळवूनही हे कुटुंब आजही गावातच वास्तव्यास आहे. त्यांची शेतीशी नाळ जोडलेली आहे. अवघ्या 1 हजार 600 लोकसंख्या असलेल्या छोट्या गावात नीरजजी चोप्रा यांचे साधे, प्रशस्त व एकत्र कुटुंबाचे घर पाहून सर्वजण भारावून गेले. गावातील मुलांना खेळाचे प्रशिक्षण देणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गाव सोडून महानगरांकडे न धावता आपल्या मातीशी नाते जपणे हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून आले.
मंगळ ग्रह सेवा संस्थेचा सामाजिक संदेश
या प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे शाल व श्रीफळ, श्री मंगळ ग्रह देवतेची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा, सन्मानपत्र देऊन चोप्रा कुटुंबाचा गौरव करण्यात आला. श्री. शरद कुलकर्णी यांनी सन्मानपत्राचे वाचन करून मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या हुंडामुक्त, साध्या विवाहाची शपथ व इतर सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. श्री दत्तात्रय पवार यांनी मंदिरातील विविध सामाजिक, धार्मिक व जनजागृती कार्यक्रमांचा आढावा मांडला.
श्री मंगळ ग्रह मंदिर दर्शनाचे निमंत्रण
या सत्कारामुळे प्रभावित होऊन नीरज चोप्रा यांचे आजोबा व काका सुरेंद्रजी चोप्रा यांनी संपूर्ण कुटुंबासह श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी अवश्य येऊ, असे आश्वासन दिले. आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे व्यस्त असलेल्या नीरजजी चोप्रा यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी मंदिराच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले.
एवढ्या मोठ्या खेळाडूच्या घरी जाऊन आपल्याला वेळ दिला जाईल की नाही, ही शंका मनात होती. मात्र, जमिनीवर पाय ठेवून जगणारे लोकच खऱ्या अर्थाने खूप महान असतात, हे चोप्रा कुटुंबीयांनी सिद्ध केले. या उपक्रमातून साधा विवाह, हुंडामुक्त समाज व भारतीय संस्कृतीचे जतन हा संदेश संपूर्ण देशभर पोहोचविण्याचा संकल्प श्री मंगळ ग्रह सेवा संस्थेने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
– आशिष चौधरी,
सेवेकरी, मंगळ ग्रह सेवा संस्था.
श्री मंगळ ग्रह मंदिर येथे अभिषेक करणाऱ्या सर्व भाविकांना ‘‘ हुंडा देणार नाही हुंडा घेणार नाही. भारतीय परंपरेला अभिप्रेत असलेल्या आदर्श कुटुंब व्यवस्थेचे जतन करू. कौटुंबिक हिंसाचार होऊ देणार नाहीत. सुनेला मुलीसारखे वागवू. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत. ’’ यासारख्या अनेक आदर्श बाबींची शपथ दिली जाते. आम्ही मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून राबवित असलेल्या या काळाची गरज असलेल्या उपक्रमाला पूरक असलेले कार्य मा. श्री. नीरजजी चोप्रा यांनी केल्याने आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. चोप्रा परिवाराच्या आदरातिथ्याने आम्ही भाराऊन गेलो आहोत. यासाठी आम्हाला केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व त्यांचे स्वीय सहाय्यक विजय देशमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले.
– श्री. शरद कुलकर्णी,
जनसंपर्क अधिकारी, मंगळ ग्रह सेवा संस्था.
खंद्रागाव, जि. पानिपत (हरियाणा) ः सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांचे आजोबा धर्मसिंग चोप्रा व काका सुरेंद्रजी चोप्रा यांच्या भेटीप्रसंगी उपस्थित मंगळ ग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुळकर्णी, सेवेकरी श्री. आशिष चौधरी व श्री. दत्तात्रय पवार.

