अमळनेर येथील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरूच; कारवाईची मागणी  लामा जिनींग येथील सीसीआय केंद्रातील अनियमिततेबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन
1 min read

अमळनेर येथील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरूच; कारवाईची मागणी लामा जिनींग येथील सीसीआय केंद्रातील अनियमिततेबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन

Loading

अमळनेर येथील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरूच; कारवाईची मागणी

लामा जिनींग येथील सीसीआय केंद्रातील अनियमिततेबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन

अमळनेर |प्रतिनिधी :
अमळनेर येथील लामा जिनींगमध्ये सुरू असलेल्या सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अमळनेर येथे सीसीआय केंद्र बंद होते. केंद्र पुन्हा सुरू झाले त्या दिवशी शेतकऱ्यांचे कापूस मोजमाप सुरळीत झाले; मात्र त्यानंतरच्या दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कापसामध्ये कवडी आहे, कचरा जास्त आहे, माऊचर अधिक आहे अशी कारणे सांगून प्रत्येक क्विंटलमागे ५ ते ६ किलो वजन कपात (कट्टी) करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याशिवाय प्रति क्विंटल २० रुपये ‘मापाई’ म्हणून रोख रक्कम घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाहनांचे वजन मोजताना ५ ते ६ किलोची कट्टी खाली वजनात ‘अ‍ॅडजस्ट’ केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना काटापट्टीवर प्रत्यक्ष कपात झाल्याचे वजन दिसून येत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यास केंद्र बंद करू, तालुका ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच, दुसऱ्या जिनींगमध्ये सीसीआय केंद्र सुरू करण्याची मागणी केल्यास केवळ आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात दुसरे केंद्र सुरू करण्यात येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध नसून त्यांची अडवणूक होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व प्रकारामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून, या गंभीर प्रकरणात प्रशासनाने स्वतः लक्ष घालून तातडीची चौकशी करावी व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन प्रा सुभाष पाटील, सुकलाल पाटील, सुरेश पिरन पाटील, योगेंद्र रामसिंग पाटील, धनगर दला पाटील, दिनेश उत्तमराव पवार, रवींद्र देशमुख, रविंद्र पाटील, संजय माधवराव पाटील,प्रताप पाटील, रणजित प्रताप पाटील,गिरीश पाटील आदी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *