अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद!  नागपूर येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी  प्रलंबित मागण्यांवर शासनाशी सकारात्मक चर्चा; वेतन, ग्रॅच्युटी व पेन्शनबाबत दिलासा मिळण्याची आशा
1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद! नागपूर येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी प्रलंबित मागण्यांवर शासनाशी सकारात्मक चर्चा; वेतन, ग्रॅच्युटी व पेन्शनबाबत दिलासा मिळण्याची आशा

Loading

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद!

नागपूर येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी

प्रलंबित मागण्यांवर शासनाशी सकारात्मक चर्चा; वेतन, ग्रॅच्युटी व पेन्शनबाबत दिलासा मिळण्याची आशा

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नागपूर येथील यशवंत स्टेडियम, धनतोली येथे आयोजित धरणे आंदोलन यशस्वी ठरले. राज्यभरातील सुमारे एक हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रतिनिधींनी एकत्र येत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनाचे नेतृत्व समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे (धुळे), संजय मापले (अमरावती), जयश्री वाबळे (अहिल्यानगर) आणि रामकृष्ण बी. पाटील (जळगाव) यांनी केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा व त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

1. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत.
2. महागाई लक्षात घेऊन केंद्र सरकारने मानधनात भरीव वाढ करावी.
3. कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता तो दरमहा मानधनात सरसकट समाविष्ट करावा.
4. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करावी.
5. सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी.
6. FRS करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात.
7. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील थकीत मोबदला त्वरित अदा करावा.
8. उन्हाळी सुट्टी पंधरा दिवसांऐवजी एक महिना द्यावी.
धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार आमश्या दादा पाडवी (अक्कलकुवा), आमदार रवी राणा (बडनेरा) आणि आमदार अमोल दादा पाटील (एरंडोल–पारोळा) यांनी आंदोलनस्थळी भेट देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला व शासनस्तरावर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
तसेच महिला व बालविकास विभागाचे उपसचिव श्री. विलास ठाकूर व कक्ष अधिकारी श्री. जाधव यांनी जयश्री वाबळे, रामकृष्ण बी. पाटील आणि संजय मापले यांच्या शिष्टमंडळाशी नवीन हैदराबाद भवन, नागपूर येथे सविस्तर चर्चा केली. या चर्चेत प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांवर फेरविचार, सेवानिवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी व आजारपणाची भरपगारी रजा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय अंगणवाडी केंद्रांचे काम सुलभ करण्यासाठी अद्ययावत मोबाईल व सिमकार्डसाठी निधी देण्यात येईल, तसेच FRS, पोषण ट्रॅकर व ऑनलाइन कामातील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रकल्पस्तरावर कर्मचारी नियुक्त केले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.
गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार सेविका व मदतनीसांना अनुक्रमे ₹24,800/- व ₹20,400/- वेतन लागू करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे श्री. ठाकूर यांनी सांगितले.
चर्चा सकारात्मक झाल्याने धरणे आंदोलन यशस्वी झाल्याचे समन्वय समितीने जाहीर केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजू पाटील, गोवर्धन मिसाळ, चंदाताई नवले, वकील पाटील, आशा जाधव, अमोल बैसाणे, शालिनी देशमुख व संध्या पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *