शैक्षणिक सहल एक अद्वितीय अनुभव..*शब्दांकन, श्री शरद भिका पाटील, इंग्रजी शिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अमळनेर
1 min read

शैक्षणिक सहल एक अद्वितीय अनुभव..*शब्दांकन, श्री शरद भिका पाटील, इंग्रजी शिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अमळनेर

Loading

*शैक्षणिक सहल एक अद्वितीय अनुभव..*

सहल म्हणजे, केवळ प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे नसून.. त्या स्थळांचा इतिहास जगणे असते.. अभ्यासक्रमाच्या पुस्तकात केवळ चित्रात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवणे असते.. महाराष्ट्रातील हा जाज्वल्य इतिहास जगण्याची अनुभूती या सहलीदरम्यान विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आली..

*९ डिसेंबर २०२५ (मंगळवार)*

सर्व प्रशासकीय परवानग्या घेत व सहलीचे सर्व सोपस्कार पार पाडून दिनांक ९ डिसेंबर २०२५ च्या रात्री आठ–साडेआठ वाजता एकूण ८० विद्यार्थी व आठ शिक्षक दोन महामंडळाच्या बसेसमधून सहलीला निघाले.. विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहलीला शुभेच्छा व निरोप दिला. उन्हेरे, रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर, वाई, जेजुरी, शिर्डी इ. ठिकाणी जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह जाणवत होता.. थंडीचा कडाका जाणवत असूनही त्यांचा उत्साह थंडावत नव्हता..

*१० डिसेंबर २०२५ (बुधवार)*

रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे सहा वाजता आम्ही *महडच्या वरदविनायक* दर्शन घेतले.. आणि सहलीचा श्रीगणेशा गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाला.. तेथून काहीच अंतरावर *उन्हेरे या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या* ठिकाणी विद्यार्थ्यांनी मस्तपैकी गरम पाण्यात आंघोळी केल्या.. स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे या गरम पाण्यात ज्यांनी आंघोळी केल्या त्यांचे त्वचेचे विकार दूर होतात.. त्यामुळे पुणे मुंबईहून काही लोक नियमितपणे येथे आंघोळी करण्यासाठी येतात.. ताजेतवाने होऊन मस्तपैकी सोबत आणलेल्या गोड पापड्या, तिखट पापड्या यांचा नाश्ता झाला.. त्यानंतर काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या *पालीच्या बल्लाळेश्वराचे* सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मनोभावे दर्शन घेतले.. थोडा वेळ थांबून कढी खिचडीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.. तेथून आम्ही ऐतिहासिक महत्त्व असलेल्या *महाड* या ठिकाणी मार्गस्थ झालो. प्रवासादरम्यान विद्यार्थी खूप धमाल मस्ती करत होते.. कारण क्रमिक पुस्तकांच्या अभ्यासातून त्यांची सुटका होऊन एक वेगळी अनुभूती त्यांना मिळत होती.. आम्ही कोकणात प्रवेश केला होता.. विद्यार्थी व शिक्षक कोकणातील निसर्गाचा अद्वितीय नमुना डोळ्यांमध्ये साठवत होते.. सुंदर झाडी, घाट रस्ते.. सारं काही अप्रतिम भासत होतं.. माणगावला बसेसमध्ये डिझेल भरले. महाड येण्यापूर्वीच *गांधारपाले* या बौद्धकालीन लेण्यांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.. आणि तिथून जवळच असलेल्या महाड येथील *क्रांती स्तंभाला* आम्ही भेट दिली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे दहन केले होते.. तिथून पायी चालत गावात *चवदार तळ्याला* सर्व विद्यार्थ्यांनी भेट दिली.. आणि इतिहासाच्या पुस्तकात नोंद असलेल्या या चवदार तळ्याचा इतिहास डोळ्यासमोर झरझर येऊन गेला..

एक स्थळ पाहिले गेले की, लगेचच विद्यार्थी प्रश्न विचारत होते, “सर आता कुठे जायचं?” प्रत्येक स्थळाबाबत त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचत होती.. शिक्षक त्यांच्या प्रश्नांचे समाधान करत होते.. महाड होऊन आम्ही तडक स्वराज्याची राजधानी असलेल्या *किल्ले रायगडाकडे* कूच केली.. अंधार होत आला होता.. पण *पाचाळ येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधी* स्थळाला आम्ही भेट दिली.. समाधी दर्शन घेत असताना मराठ्यांचे स्वराज्य आणि त्याचा इतिहास डोळ्यासमोरून झरझर जात होता. जिजाऊंनी घडवलेला शिवबा, या शिवबाने निर्माण केलेल्या स्वराज्याबाबत मनात विचार येत होते. तेथून तडक रायगडाच्या अगदी खालच्या बाजूला असलेल्या रायगड फार्महाउसवर आम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षक मुक्कामास थांबलो. दिवसाची सांगता दोन अष्टविनायकांचे दर्शन व काही ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थळांना भेट देऊन झाली.

*११ डिसेंबर २०२५ (गुरुवार)*

रात्रीच झोपताना आदेशित केल्यामुळे विद्यार्थी पहाटे लवकर उठून साडेसहा वाजता नाश्ता करून किल्ले रायगड चढाईस सज्ज झाले.. वातावरणात थंडीचा गारठा जाणवत असला तरी रायगडाच्या वातावरणात एक वेगळे चैतन्य आणि ऊर्जा जाणवत होती.. “छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव! जय भवानी, जय शिवाजी!” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. रायगडाबाबत योग्य इतिहास माहिती पडावी यासाठी आम्ही काही पैसे देऊन गाईड लावून घेतला. चित्ते दरवाजाजवळ बांधकाम चालू असल्यामुळे तो मार्ग वर चढाईसाठी बंद होता.. पुढे नाणे दरवाजा मार्गे आम्ही वर महादरवाजा, हिरकणी टोक, टकमक टोक असे ऐतिहासिक खुणा असलेल्या भागाकडून वर मुख्य गडावर चढलो.. गाईड या सर्व स्थळांबाबत आम्हाला वेळोवेळी माहिती देत होता.. तो इतिहास ऐकून अंगावर काटे येत होते.. तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोरून घेऊन जात होती.. कसे असतील ते राजे आणि कसे असतील त्यांचे ते मावळे.. शूरवीर.. बहादूर.. प्राणाची पर्वा न करणारे.. वर हत्ती तलाव, गंगासागर तलाव, राणी वास, छत्रपती शिवरायांचा मुख्य महाल, धान्याचे कोठार, अष्टप्रधान मंडळ राहण्याची जागा, सचिवालय, दिवाणे खास.. आणि नंतर ज्या ठिकाणचा इतिहास सूर्य चंद्र तारे अस्तित्वात असतील तोपर्यंत तेवढा राहील.. अशा जागी आम्ही आलो.. ती जागा म्हणजे नगारखाना आणि नगारखाना समोर छत्रपती शिवरायांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला तो सभा मंडप.. या ठिकाणी मी शिवगर्जना केली.. आणि विद्यार्थ्यांच्या जयघोषात हा सभा मंडप दुमदुमून उठला.. गाईडने सर्व इतिहास या ठिकाणी सांगितला.. पुढे होळीचा माळ आणि मुख्य बाजारपेठ करत आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात येऊन पोहोचलो.. राजे या जगदीश्वराचे दर्शन नियमाने घेत.. त्यानंतर (“सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर”) जगातलं सर्वात मोठं बक्षीस असलेली पायरीचे दर्शनही आम्ही घेतले.. स्वराज्य रक्षक संभाजी राजांनी आपले पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बांधलेल्या समाधीचे दर्शन नतमस्तक होऊन आम्ही घेतले.. पुढे विवादात्मक असलेल्या “वाघ्या” कुत्र्याची समाधी आम्ही पाहिली.. तिथून तडक विद्यार्थ्यांना घेत एक सव्वा तासात दमछाक करत आम्ही गड पायउतार झालो.. खाली सुरुची भोजनाचा आनंद घेतला.. साधारण अडीच वाजता तिथून आम्ही निघालो.. थेट *प्रतापगडाच्या* पायथ्याशी साडेचार पाच वाजता येऊन पोहोचलो.. शिवरायांच्या पराक्रमाची सर्वात मोठी घटना या प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेली आहे.. ती म्हणजे अफजलखानाचा वध.. रायगडावर चढण्या उतरण्याचा थकवा जाणवत असला तरी शिवरायांच्या इतिहासामुळे सगळ्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा होती. पटापट खाली उतरून वर बुरुज असलेला सुळका जो चौथीच्या इतिहासाच्या मुखपृष्ठावर चित्र स्वरूपात आहे.. त्यावर आम्ही घोषणा देत.. सर्व विद्यार्थी चढलो.. तिथून सर्व जावळीचे खोरे, हिरवा गार परिसर एकदृष्टीक्षेपात नजरेसमोर पडत होता.. तिथूनच समोर अफजल खानाची कबर दिसत होती.. तिथून वर आई भवानीच्या मंदिराचे दर्शन घेतले.. किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जगातील पहिलाच अश्वारूढ भव्य पुतळा आम्ही पाहिला.. आणि त्याचे दर्शन घेतले.. अंधार पडला होता व शरीरात थकवा जाणवत होता.. पटापट गडाची पायउतार झालो.. आणि थेट महाबळेश्वर मार्गे खाली वाईला भव्य अशा मधुरा रिसॉर्टवर साधारण साडेनऊ दहा वाजता येऊन पोहोचलो.. वाई येथे इरिगेशनमध्ये काम करत असलेले ‘आरव’ नावाच्या विद्यार्थ्याचे काका त्याला व आम्हांस भेटायला आले.. फ्रेश होऊन जेवणाचा आस्वाद घेऊन रात्री झोपी गेलो..

*१२ डिसेंबर २०२५ (शुक्रवार)*

सकाळी सहा साडेसहा वाजता सर्वजण तयार झालो.. रिसॉर्ट अतिशय निसर्गरम्य असल्यामुळे विद्यार्थी जागोजागी फोटोग्राफ घेत होते.. तो मोह आम्हालाही आवरता आला नाही.. सर्व लवाजमा घेत आम्ही वाईच्या प्रसिद्ध गणपती व काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेलो.. सकाळी ते पालक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आमच्या नाष्ट्याची व्यवस्था केली होती.. वाईला असलेल्या नदीवरच्या घाटावर अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहे.. असं ते पालक आम्हांस सांगत होते. त्यांच्याकडचा नाश्ता करून त्यांचा निरोप घेत.. आम्ही पाचगणीच्या दिशेने निघालो.. वाई ते पाचगणी महाबळेश्वर पूर्ण घाट रस्ता आहे.. निसर्गाचा अप्रतिम नमुना, विहंगमदृश्य आमच्या डोळ्यासमोर दिसत होते. वर चढता आम्हाला *पाचगणीचा सिडनी पॉइंट* लागला.. कृष्णा नदीचे विहंगम दृश्य या पॉइंटवरून नजरेस पडत होते.. मनसोक्त फिरल्यानंतर आम्ही पाचगणीचा सर्वात बेस्ट पॉइंट असलेल्या *टेबल लँड* याच्यावर पोहोचलो.. त्या ठिकाणी असंख्य असे घोडे घोडागाडी नजरेत पडत होते..हे पाचगणीतील सर्वात सुंदर पठार आहे.. या ठिकाणी देखील असंख्य चित्रपटांची शूटिंग झालेली आहे.. असं आम्हाला तिथल्या स्थानिक गाईड सांगत होता.. तेथील आनंद घेत आम्ही महाराष्ट्रातलं थंड हवेचे ठिकाण *महाबळेश्वर* या ठिकाणी असलेल्या *वेण्णा लेक* या पॉइंटवर येऊन पोहोचलो.. त्या ठिकाणी देखील हॉर्स रायडिंग त्याचबरोबर, बोटिंगचा आनंद लुटता येत होता.. पण प्रचंड महागाई असल्याकारणाने आम्ही ते करू शकलो नाही.. त्याचबरोबर वेळही फार कमी होता.. इथून अतिशय चिंचोक्या आणि दुतर्फा निसर्गरम्य रस्त्यातून आम्ही *श्रीक्षेत्र महाबळेश्वर* च्या दर्शनासाठी येऊन पोहोचलो.. हजारो वर्षांपूर्वीची ही शिवलिंग इथं आहे व ८०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले आहे.. छत्रपती शिवरायांनी आपल्या मातोश्री जिजाऊंची सुवर्णतुला याच मंदिरात केली होती.. प्रसन्न भावाने सर्वांनी दर्शन घेतले.. तेथून आम्ही मॅप्रो गार्डन येथे पोहोचलो.. भरपेट नाश्ता करून मॅप्रो गार्डनमधील वेगवेगळ्या स्ट्रॉबेरींचे क्रश, चॉकलेट्स व इतर पदार्थ सॅम्पल फ्री खाण्याचा व खरेदी करण्याचा आनंद सर्वांनी घेतला.. तिथून सायंकाळी आम्ही जेजुरी गडाकडे सासवडच्या पुढे माऊली ढाब्यावर साधारण साडेनऊ दहा वाजता रात्रीचे जेवण घेतले.. आणि जेजुरीच्या पायथ्याशी मुक्कामास थांबलो..

*१३ डिसेंबर २०२५ (शनिवार)*

पहाटे लवकर उठून शेजारीच असलेला जेजुरी गड आम्ही तयार होऊन सर केला.. खंडोबाचे दर्शन सर्व विद्यार्थ्यांनी घेतले.. खाली उतरून पुन्हा माऊली ढाब्यावर साडेदहा अकरा वाजता जेवण घेतले.. मार्गस्थ होऊन मोरगावच्या मयुरेश्वर दर्शन घेतले.. पुढे रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतले.. आणि रात्री आठ साडेआठ वाजता शिर्डीला महाप्रसाद सर्वांनी घेऊन साईबाबांची आरती मनोभावे केली.. आता सगळ्यांनाच घराकडची ओढ लागली होती. परतीचे वेध लागले होते.. रात्रीच्या दहाची आरती करून आम्ही साडेदहा वाजता शिर्डी सोडले.. बसेसमध्ये सर्व विद्यार्थी गपगार झोपी गेले होते.. 14 डिसेंबरच्या पहाटे पहाटे चार वाजता सर्वजण आर्मी स्कूलच्या प्रांगणात सुखरूप पोहोचले.. एकूणच ट्रिप खूप अनुभवजण्य ठरली.. ज्यात अष्टविनायकांपैकी चार व वाईचा एक असे पाच गणपती दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले.. काशीविश्वेश्वर ,जगदीश्वर, महाबळेश्वर तीन शिवशंकरांचे दर्शन घेतले. रायगड आणि प्रतापगड शिवरायांचे दोन महत्त्वपूर्ण किल्ल्यांना भेटी दिल्या.. महाबळेश्वर निसर्गरम्य स्थळाला भेट दिली..

या सहलीचे बहारदार नियोजन प्राचार्य बी. डी. पाटील,ज्येष्ठ शिक्षक आर एम शिंदे,ज्येष्ठ संगणक शिक्षक सुनिल महाले यांनी केले..
माझ्यासोबत, सहल प्रमुख ज्येष्ठ शिक्षक आर एम शिंदे ,ज्येष्ठ संगणक शिक्षक सुनील महाले,ज्येष्ठ कलाशिक्षक जगदीश पाटील, इंग्रजी शिक्षक एस बी पवार, हिंदी शिक्षक टी के पावरा, गणित शिक्षक शिवाजी पाटील, भूगोल शिक्षक भूषण साळुंखे सहली दरम्यान विद्यार्थ्यांची काळजी वाहण्यासाठी मेहनत घेत होते..
या सहलीला *नानासाहेब विजय नवल पाटील*(संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री)
*ताईसो. शिलाताई पाटील*
(संस्थेच्या प्रमुख मार्गदर्शिका)
*बाळासाहेब अनिकेत पाटील*
(संस्था कार्याध्यक्ष, नवलभाऊ प्रतिष्ठान)
*आबासो.डी.बी.पाटील*
(प्रशासकीय अधिकारी)
*प्रा. सुनील गरुड सर*
(संस्थेचे मानद शिक्षण संचालक)
*प्रा श्याम पवार सर*
(प्रशासकीय अधिकारी)
श्री.बी.डी.पाटील
प्राचार्य, विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अमळनेर)
शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या..

शब्दांकन,
श्री शरद भिका पाटील,
इंग्रजी शिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *