शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा
![]()
शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा
शिंदखेडा येथे धुळे–नंदुरबार–जळगाव–नाशिक तसेच संपूर्ण कान्हादेशातील हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत प.पू. वैकुंठवासी विठ्ठल बुवा चौधरी उर्फ मोठेबाबा यांचा जयंती महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी माळीवाडा येथील संत सावता माळी मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. मोठेबाबांच्या प्रतिमा व पादुका आकर्षक सजवलेल्या रथातून विराजमान करण्यात आल्या, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांनी सजवलेली मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, कृष्णा माऊली तसेच खानदेशातील अनेक संत–महंत यांचे बगी सजवून मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सामील करण्यात आले. बाल-टाळकरी, भजनी मंडळांचे टाळ–मृदंग, महिलांच्या माथ्यावरची तुळस, आणि वारकऱ्यांचा अविरत जयजयकार यामुळे संपूर्ण शिंदखेडा गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. गावकऱ्यांनी घरोघरी सडा–रांगोळी टाकून पालखीचे स्वागत केले. माळीवाडा–गांधी चौक–रेल्वे स्टेशन–मेन गल्ली–बिजासनी असा प्रवास करत दिंडी सोहळ्याने गावात दिव्य वातावरण निर्माण केले.
मुख्य कार्यक्रमाचा समारोप बिजासनी मंगल कार्यालयात झाला, जिथे राज्य शिष्टाचार मंत्री व पालकमंत्री मा. जयकुमार रावल, आमदार राम भदाणे, जि.प. अध्यक्ष अरविंद जाधव आणि जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांनी उपस्थित राहून मोठेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. विविध संत–महंत, कीर्तनकार आणि भक्त उपस्थित असताना मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले. मा. जयकुमार रावल यांनी मोठेबाबांनी खानदेशात वारकरी संप्रदायाला दिलेले योगदान अधोरेखित करत भविष्यात मोठेबाबांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आमदार राम भदाणे यांनी आपला वारकरी परंपरेशी असलेला कुटुंबीय नातेसंबंध सांगत मोठेबाबांचा पुढील जन्मसोहळा धुळे येथे आयोजित करण्याची मागणी केली.
कान्हादेश वारकरी मंडळातर्फे मान्यवरांच्या हस्ते विविध वारकरी सेवक, कीर्तनकार आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 40 वारकऱ्यांनी सहभागी होऊन समाजसेवेचा आदर्श उभारला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिरामण गवळी, नारायण पाटील, अनिल वानखेडे, बापू खलाणे, सुधाकर भोकरे, सुनील वाघ, भैय्यासाहेब पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठेबाबांच्या जयंती महोत्सवाने शिंदखेडा गाव भक्तिभाव, निस्वार्थ सेवा व वारकरी परंपरेच्या भावनेने उजळून निघाले.

