आय एम आर डी परिसंस्थेत सायबर सुरक्षा जागरूकता सप्ताह उत्साहात संपन्न
शिरपूर प्रतिनिधी:
वेदांत माळी
गौरव पाटील
शिरपूर येथील आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट येथे पदवी विभागाच्या वतीने दि. 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सायबर सुरक्षा जागरूकता व स्वच्छता सप्ताह परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण मंत्रालय आणि इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C) यांच्या अलीकडील निर्देशांच्या अनुषंगाने आयोजन करण्यात आले होते. डिजिटल युगात ज्ञानवृद्धीच्या असंख्य संधी उपलब्ध असल्या तरी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक व डेटा चोरीचे धोकेही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आजच्या डिजिटल युगात सायबर स्वच्छता, जबाबदार ऑनलाइन वर्तन आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दि. 13 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची सुरुवात सायबर सुरक्षा प्रतिज्ञा घेण्याने झाली, ज्यामध्ये 273 विद्यार्थ्यांनी सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याची व ऑनलाइन संशयास्पद क्रिया, घडामोडींबाबत तात्काळ कळविण्याची शपथ घेतली. दि. 14 नोव्हेंबर सायबर जागरूकता मोहिमेत सेमिनार द्वारा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्यात आली. या मोहिमेदरम्यान फिशिंग, ओळख चोरी, सायबर बुलिंग, मालवेअर हल्ले, ऑनलाइन फसवणूक इत्यादी सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवावी, सुरक्षित ब्राउझिंग कसे करावे? सायबर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सामूहिक सहभाग वाढवणे याबाबत मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये 282 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
17 ते 18 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ई-क्विझमध्ये 202 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पासवर्ड व्यवस्थापन, डिजिटल फूटप्रिंट्स, सोशल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांवरील प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक बळकट झाले. ई-पोस्टर स्पर्धेत 267 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सायबर सुरक्षा विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स तयार केली. सुरक्षित ऑनलाइन वर्तन, सायबर धमक्यांपासून बचावाचे उपाय या विषयांवर विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने जागरूकता मांडली.
या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन संचालिका डॉ. वैशाली पाटील, सहाय्यक संचालक व एम सी ए विभाग प्रमुख डॉ. मनोज बेहेरे, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. मनोज पटेल यांनी केले. तर या संपूर्ण उपक्रमाचे आयोजनासाठी पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी समन्वयकाची भूमिका पार पडली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रियांका भंडारी, प्रा. विजय गर्गे, डॉ. आशा पाटील, प्रा. ज्योती गोराणे, प्रा. ज्योत्सना माळी आणि प्रा. कीर्तिका बेहरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सायबर सुरक्षा जागरूकता सप्ताहातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढून सुरक्षित, सजग व जबाबदार नागरिकत्वाची भावना बळकट झाली.