अमळनेरच्या राजकारणाला तापलेला वेग! स्थानिक नेतृत्वाची मागणी जोरात; नगराध्यक्षपदासाठी ठाकूरांना वाढता जनसमर्थन”
![]()
“अमळनेरच्या राजकारणाला तापलेला वेग!
स्थानिक नेतृत्वाची मागणी जोरात; नगराध्यक्षपदासाठी ठाकूरांना वाढता जनसमर्थन”
अमळनेर प्रतिनिधी: आगामी नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण एकदम तापले असून, शहर विकास आघाडी आणि शिंदे सेना यांच्यात चुरशीचा सामना रंगणार हे आता उघड संकेत मिळत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होताच शहरराजकारणाला नव्या वेगाने गती मिळाली आहे. “उमेदवार कोण? पार्श्वभूमी कोणाची दमदार? शहराची पुढील पाच वर्षे कोण बदलू शकते?” या प्रश्नांवर नागरिकांमध्ये चर्चा, विश्लेषण, गटग, आणि मतमतांतरे जोरात सुरू झाली आहेत.
शहरभरात एक आवाज विशेष ठळकपणे ऐकू येतो आहे—
“नगराध्यक्ष स्थानिकच हवा!”
शहरातील प्रश्न जाणणारा, इथल्या धुळीत वाढलेला, लोकांमध्ये मिसळणारा आणि सर्वांना परिचित असा चेहरा हवा, अशी मतदारांची सामूहिक भावना आकार घेऊ लागली आहे. निवडणुकीच्या अगोदरच दिसणारे किंवा बाहेरून येऊन नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणारे चेहरे नकोत; तर वर्षानुवर्षे शहराच्या हितासाठी काम करणाऱ्या स्थानिक नेतृत्वावरच भरोसा, अशी मागणी स्पष्टपणे जाणवते.
याच पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्या नावाकडे मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे. शहरातील रहिवासी म्हणून त्यांना अमळनेरचा प्रत्येक गल्ली–बोळ, व्यापारी पट्टा, सांस्कृतिक वातावरण, तसेच वारंवार भेडसावणाऱ्या नागरी समस्यांची परिपूर्ण जाण आहे. पत्रकार म्हणून अनेक वर्षे त्यांनी शहराच्या समस्या नोंदवत, त्यावर उपाययोजना सुचवत आणि गरजेनुसार प्रशासनाला धडक देत लोकांसाठी लढा दिला आहे.
याचा परिणाम म्हणून जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार सुरू होताच मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसू लागला आहे.
प्रामाणिक स्वभाव, लोकांपर्यंत थेट पोहोच, शहरातली प्रत्येक समस्या तपशीलवार अभ्यासलेली, आणि जनतेशी सातत्याने संवाद ठेवणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक दृढ होत आहे.
शहरातील व्यावसायिक, नागरिक संघटना, महिला गट, तरुण मतदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समान सूर असा—
“शहर बदलायचे असेल, तर शहराला ओळखणाऱ्या हातातच नेतृत्व हवे!”
त्यामुळे नगराध्यक्षपदासाठीच्या चुरशीच्या लढतीत जितेंद्र ठाकूर यांची आघाडी मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. त्यांच्या नावाच्या चर्चेत वाढ, मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद, आणि स्थानिक नेतृत्वाची वाढती मागणी हे निवडणुकीचे समीकरण अधिक रंजक करत आहे.

