‘बालविवाहमुक्त भारत’साठी ISARची मोठी मोहिम! खंडाळा ZP शाळेत विद्यार्थ्यांना जागरूकतेची नवीन दिशा
![]()
‘बालविवाहमुक्त भारत’साठी ISARची मोठी मोहिम!
खंडाळा ZP शाळेत विद्यार्थ्यांना जागरूकतेची नवीन दिशा
यवतमाळ प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म (ISAR) संस्थेच्या वतीने खंडाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत ‘शंभर दिवशी बालविवाह मुक्त भारत अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. डोळस यांच्या उपस्थितीत झाले. खंडाळा येथील गटप्रवर्तक जयश्री इंगोले, मिथुन कांबळे (इसार संस्था, प्रतिनिधी) अनिता भगत (इसार संस्थेच्या जिल्हा समन्वयक), सोनिया भगत (इसार संस्थेच्या प्रकल्प समन्वयक), देविदास खरात (इसार संस्थेचे फिल्ड ऑफिसर), यांच्यासह शिक्षक सांगळे, चर्हाटे, जाधव, कटके सर आणि शिक्षिका, आशा वर्कर्स उपस्थित होत्या. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छता, वैयक्तिक सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इसार संस्थेच्या टीमने बालविवाह, बाल तस्करी, बाल लैंगिक अत्याचार, बालविवाहाची कारणे व दुष्परिणाम, तसेच त्यासंबंधीची कायदेशीर शिक्षा यांवर सविस्तर माहिती दिली. तसेच चाइल्ड हेल्पलाईन 1098 बाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण, आत्मविश्वास आणि कला-कौशल्य विकास याबाबतही मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून ‘बालविवाहमुक्त भारत’ ही शपथ घेण्यात आली.
समारोपात माननीय सांगळे सर यांनी इसार संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क व बालसुरक्षा विषयक जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले.

