रोबोसॉकर स्पर्धेत आय एम आर डी शिरपूरचा पियुष वासुदेव भोई याची चमकदार कामगिरी
![]()
रोबोसॉकर स्पर्धेत आय एम आर डी शिरपूरचा पियुष वासुदेव भोई याची चमकदार कामगिरी
शिरपूर प्रतिनिधी:
वेदांत माळी
गौरव पाटील
पुणे येथे दिनांक १३ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “रोबोसॉकर – टेनेट या राष्ट्रीय-स्तरावरील रोबोटिक्स स्पर्धेत आय एम आर डी परिसंस्थे मधील बी.सी.ए तृतीय वर्षाचा पियुष वासुदेव भोई या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले. सदर स्पर्धेत विविध महाविद्यालयातून विधार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे उदीष्ट विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्स या विषया बद्दल जागरूकता निर्माण करून प्रोत्साहन देणे हा होता.
या स्पर्धेत परिसंस्थेतील पियुषच्या “व्यूअस्त्र” (Vhyuastra) या संघाने सहभाग घेतला. ही स्पर्धा १ विरुद्ध १ रोबोटिक्स चॅलेंज स्वरूपात ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. देशभरातील विविध महाविद्यालयातून १०० पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या रोबोट द्वारे फुटबॉल सदृश सामना खेळला. रोबोटचे नियंत्रण, गोल करण्याची रणनीती आणि बचाव या तिन्ही गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांची कौशल्यपूर्ण कामगिरी दिसून आली. “व्यूअस्त्र” संघाने उपांत्य फेरी पर्यंत मजल मारत “टॉप४ मध्ये स्थान मिळवले. या कामगिरीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना भविष्यात आणखी उन्नत रोबोटिक्स प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.
या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोबोटिक्स यांत्रिकी, नियंत्रण प्रणाली, संघभावना, संवाद-कौशल्य आणि तांत्रिक नवकल्पना यांचा उत्कृष्ट अनुभव मिळाला. सदर स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पनाशक्ती, नेतृत्व गुण आणि तांत्रिक ज्ञानवृद्धी झाली. तसेच, या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता, नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आणि प्रत्यक्ष अभियंता दृष्टिकोन विकसित झाला. सदर स्पर्धेमुळे भविष्यात अशाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली. पियुष वासुदेव भोई या विधार्थ्यास प्रा.प्रियांका सैंदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए.विभागप्रमुख प्रा.मनोज बेहेरे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी कौतुक केले..

