अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा संकट — अमळनेरमध्ये पीक नुकसानीच्या तात्काळ पंचनाम्याची मागणी, माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे लेखी निवेदन मा. आ. अनिलदादा पाटील यांना सादर
![]()
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा संकट — अमळनेरमध्ये पीक नुकसानीच्या तात्काळ पंचनाम्याची मागणी
माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे लेखी निवेदन मा. आ. अनिलदादा पाटील यांना सादर
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर विधानसभा मतदारसंघात यंदा ऑक्टोबर 2025 मध्ये सलग 7 ते 8 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पीकहानी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. 30 जानेवारी 2014 अन्वये “अवेळी पाऊस” तसेच शासन निर्णय दि. 22 जून 2023 अन्वये “सततचा अवेळी पाऊस” ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. त्यानुसार राज्यातील स्थानिक प्रशासनावर पीक नुकसानीचे पंचनामे करून मदत प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार, कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी अमळनेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मा. आ. अनिलदादा पाटील यांना ‘सिंदूर’सह लेखी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी मागणी केली की —
> “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने कोणताही विलंब न करता सरसकट पंचनामे करून संबंधित प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल.”
साहेबराव पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवन हे पावसावर अवलंबून असून, त्यांच्या खरीप हंगामाचा पूर्ण विनाश झाला आहे. त्यामुळे शासनाने तत्परतेने दखल घेऊन मदत निधी वितरित करावा, हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
या निवेदनामुळे शेतकरी वर्गात दिलासा मिळाला असून, प्रशासनाच्या तात्काळ कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

