सतत प्रामाणिक राहणे आणि कर्तव्यावर ठाम राहणे – यशाची खरी गुरुकिल्ली” – डी.वाय.एस.पी. वासुदेव देसले, विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
![]()
“सतत प्रामाणिक राहणे आणि कर्तव्यावर ठाम राहणे – यशाची खरी गुरुकिल्ली” –
डी.वाय.एस.पी. वासुदेव देसले,
विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
अमळनेर प्रतिनिधी
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डी. वाय. एस. पी. वासुदेव देसले यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना प्रामाणिकता, समर्पण आणि समाजसेवेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तव्य नेहमी प्रामाणिकपणे पार पाडावे लागते. समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी काम करताना व्यक्तिमत्वाची शिस्त, धैर्य आणि पारदर्शकता अत्यंत गरजेची आहे.
.वासुदेव देसले यांनी सांगितले की, यश केवळ पद, शक्ती किंवा प्रतिष्ठेमुळे मिळत नाही, तर सतत प्रामाणिक राहणे, समस्यांना सामोरे जाणे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हितासाठी निरंतर प्रयत्न करत राहणे हेच खरी ताकद आहे. त्यांनी उपस्थितांना असेही सांगितले की, समाजातील प्रत्येक बदलाचा आधार लोकांच्या अपेक्षांवर नाही, तर आपल्याच प्रयत्नांवर असतो.
त्यांच्या मनोगतातील मुख्य संदेश असा होता: “आपण जे करतो ते केवळ स्वतःसाठी किंवा आपल्यासाठी मर्यादित राहू नये; प्रत्येक कार्य समाजासाठी, लोकांसाठी असेल, तरच त्याचे फलित खऱ्या अर्थाने टिकते. आपले कर्तव्य, प्रामाणिकता आणि समर्पण हीच खरी प्रेरणा आहे.”
या प्रेरणादायी मनोगतातून कार्यक्रमाच्या श्रोत्यांना विचारांची नवी दिशा मिळाली व समाजसेवेच्या महत्त्वाचे दर्शन झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविवर्य प्रा. बी. एन. चौधरी (धरणगाव) यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून डॉ. डिगंबर महाले (अध्यक्ष – मंगळग्रह सेवा संस्था) उपस्थित होते.
व्यासपीठावर मा. कपिल पवार (उपआयुक्त, आदिवासी विकास विभाग), डॉ. जयदीप दादा पाटील (अध्यक्ष, नोबेल फाऊंडेशन), डॉ. अविनाश जोशी (अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ), डिवायएसपी वासुदेव देसले, मयूर पाटील (वरिष्ठ प्रबंधक, युनियन बँक), विजयसिंह पवार (सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक) शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
आपल्या प्रास्ताविकात ईश्वर महाजन यांनी मराठी लाईव्ह न्युजचा सहा वर्षांचा खडतर पण प्रेरणादायी प्रवास मांडला. “पत्रकारिता ही समाजातील सकारात्मकता पेरण्याचं माध्यम आहे; प्रत्येक सन्मान ही प्रेरणेची बीजं आहेत,” असे ते म्हणाले.
प्रेरणा पर्व 2025 मध्ये कपिल पवार सर यांनी उपस्थितांना अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, समाजासाठी कार्य करताना स्वतःवर काम करणे अत्यंत गरजेचे आहे. “आपल्या जीवनात काही ‘रॅकेट्स’ असतात – एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह ठेवणे, खोटे प्रकट करणे किंवा उगाच काहीतरी दाखवून देणे. यामुळे मानसिक ताण येतो आणि कार्यात अडथळे येतात. लोकांच्या अपेक्षा न बघता स्वतःच्या सुधारणा करा. हेच खरे प्रेरणास्थान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी उपस्थितांना वैचारिक, मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचे महत्त्व सांगितले, तसेच कुटुंब व समाजातील बॉण्डिंग मजबूत ठेवण्याचा संदेश दिला.
आपण अनेकदा इतरांना खूश ठेवण्यासाठी स्वतःला विसरतो, अपेक्षांमध्ये जगतो. पण स्वतःसाठी वेळ दिला नाही तर सामाजिक कार्यात स्थैर्य राहत नाही. म्हणून ध्यान, व्यायाम आणि आत्मपरीक्षण हीच खरी प्रगती आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. जयदीप पाटील यांनी त्यांच्या सहज आणि ओघवत्या शैलीत समाज, पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर प्रभावी भाष्य केले. “पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची दिशा दाखवणारी शक्ती आहे. आज सोशल मीडियाने माहितीचं लोकशाहीकरण केलं, पण जबाबदारी वाढवली आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “दिवाळी आता घराघरात न राहता मोबाईलच्या स्क्रीनवर गेली आहे. रील संस्कृतीने विचारांवर अधिराज्य गाजवले आहे. म्हणून खरी दिवाळी म्हणजे अंतःकरणातील प्रकाश वाढवणे!”
त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हॉट्सअॅप स्टेटस संस्कृती, आणि युवकांच्या मोबाईल व्यसनावर गंभीर चिंतन मांडत म्हटले – “आयुष्यात श्रीमंती म्हणजे पैसा नव्हे, तर समाधानी मन हेच खरे वैभव आहे.”
त्यांचे विचार उपस्थित प्रत्येक श्रोत्याला अंतर्मुख करणारे ठरले.
इतर मान्यवरांचे मनोगत
कार्यक्रमाचे उद्घाटक व मंगळ ग्रह सेवा संस्थांनचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी प्रामाणिक पत्रकारितेची गरज अधोरेखित करत म्हटले, “आज चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धैर्य कमी झालं आहे. मराठी लाईव्ह न्युज हे ते धैर्य दाखवत आहे.”
डॉ. अविनाश जोशी यांनी खानदेशातील साहित्यिकांसाठी “खानदेश रत्न” पुरस्काराची संकल्पना मांडली.
शाखा प्रबंधक मयूर पाटील, आणि विजयसिंह पवार यांनीही सामाजिक कार्य, शिक्षण, आणि नात्यांच्या संवर्धनाबाबत अर्थपूर्ण विचार मांडले.
‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार वितरण
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा मान्यवरांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कारार्थींची यादी पुढीलप्रमाणे –
1️⃣ डॉ. अविनाश रघूराज जोशी (अमळनेर) – वैद्यकीय व साहित्य क्षेत्र
2️⃣ श्री. मयूर चंद्रकांत पाटील – वरिष्ठ प्रबंधक, युनियन बँक, सामाजिक क्षेत्र
3️⃣ प्रा. डॉ. विजय तुंटे – शैक्षणिक क्षेत्र
4️⃣ सौ. अनुपमा रामेश्वर जाधव (डहाणू) – साहित्य क्षेत्र
5️⃣ डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी (ठाणे) – सामाजिक क्षेत्र
6️⃣ श्री. सुनील दयाराम महाजन – स्वेच्छानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल, सामाजिक क्षेत्र
7️⃣ श्री. दशरथ सोमा लांडगे व सौ. वसुंधरा लांडगे – आदर्श माता-पिता
8️⃣ डॉ. प्रसाद अशोक पाटील – विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी, चोपडा
9️⃣ सौ. शोभा रघुनाथ शिंदे – सामाजिक क्षेत्र
🔟 अॅड. कौस्तुभ सुनील पाटील – युवा व सामाजिक कार्य
11️⃣ अॅड. सारांश धनंजय सोनार – युवा प्रेरणा पुरस्कार
संपादक ईश्वर महाजन यांनी सर्व उपस्थित मान्यवर,मुख्याध्यापक,
पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी,जाहिरातदार व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानले. “सन्मान प्रेरणेचं बीज असतं; आणि प्रेरणा ही परिवर्तनाचं कारण ठरते,” असे सांगून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
सुत्रसंचालक सौ. वसुंधरा लांडगे यांच्या सुमधुर आवाजात राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
वैचारिक दिवाळीची मेजवानी
एकूणच, दिवाळीच्या उत्सवात विचार, संस्कृती आणि समाजप्रेरणा यांचं संगम घडवणारा हा कार्यक्रम सर्व उपस्थितांसाठी चिरस्मरणीय ठरला.
मान्यवर व रसिक श्रोत्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की —
“हीच खरी दिवाळी – मन, विचार आणि कृती उजळवणारी!”




