दिवाळीतील ५०० पत्रांची जादू!” — जेष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांच्या हातांनी लिहिलेली भावनांची दिवाळी
![]()
“दिवाळीतील ५०० पत्रांची जादू!”
— जेष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांच्या हातांनी लिहिलेली भावनांची दिवाळी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा झटपट माध्यमांनी माणसांतील संवादाला गती दिली असली, तरी त्यातील भावनांचा स्पर्श हरवला आहे. पूर्वी लाल पत्रपेटीत टाकलेले पत्र म्हणजे मनाच्या भावनांचे दूत असायचे. आज ती पत्रसंस्कृती जवळजवळ लोप पावत चालली आहे. पण या वेगळ्या प्रवाहातही काही माणसे परंपरेचा दिवा पेटवत आहेत.
अशाच एका व्यक्तीने— अमळनेरचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी— या दिवाळीत हृदयातून ओसंडणाऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात आणि स्वतः रंगवलेल्या चित्रांसह तब्बल ५०० दिवाळी शुभेच्छा पत्रे पाठवून एक आगळावेगळा विक्रम घडवला आहे.
धनंजय सोनार गेली २५ वर्षे या अनोख्या परंपरेचा सन्मानपूर्वक जप करत आहेत. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या निमित्ताने ते आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना तसेच समाजातील विविध क्षेत्रातील परिचितांना हाताने रंगवलेले शुभेच्छा पत्र पाठवतात.
त्यांच्या प्रत्येक पत्रात केवळ रंगच नाहीत, तर भावनांचा सुगंध, आठवणींचा स्पर्श आणि आत्मीयतेची ऊब जाणवते. त्यामुळे ही पत्रे प्राप्त करणारे अनेक जण म्हणतात — “खूप वर्षांनी आमच्या दारी पोस्टमन आला, आणि त्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.”
आज ५० पैशांच्या छोट्याशा पोस्टकार्डद्वारे देशभरात कुणालाही आपला निरोप पोचवता येतो, हे सोनार यांच्या उपक्रमातून समाजाला पुन्हा लक्षात आले आहे. केवळ सोशल मीडियावर ‘सेन्ड’ न करता, स्वतःच्या हाताने लिहिलेल्या शब्दांमध्येही किती शक्ती असते हे त्यांनी सिद्ध केले आहे.
त्यांच्या या सुंदर उपक्रमाने केवळ पत्रसंस्कृती नव्हे, तर भावनिक नात्यांचे धागे पुन्हा जिवंत केले आहेत.
“मनापासून लिहिलेलं पत्र – हीच खरी दिवाळीची भेट!”

