विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचं समाधान शोधणारे  उपक्रमशील शिक्षक – दिनेशकुमार टाक
1 min read

विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचं समाधान शोधणारे  उपक्रमशील शिक्षक – दिनेशकुमार टाक

Loading

विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचं समाधान शोधणारे  उपक्रमशील शिक्षक – दिनेशकुमार टाक

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
शिक्षण क्षेत्र म्हणजे केवळ ज्ञानदान नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडविण्याचं पवित्र कार्य. या कार्याची प्रामाणिक जबाबदारी मनापासून पार पाडणारे शिक्षक म्हणजे शारदा माध्यमिक विद्यालय व ने. मि. कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, कळमसरे येथील इंग्रजी विषयाचे आदर्श शिक्षक श्री. दिनेशकुमार टाक.
दिनेशकुमार टाक हे जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून इंग्रजी विषयावरील त्यांचा गाढ अभ्यास आणि प्रेम विद्यार्थीदशेपासूनच दिसून येतो. इंग्रजी विषय शिकविण्याची त्यांची शैली विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत ते इंग्रजी शिकवितात आणि प्रत्येक धड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना दोन दिवसांचा पुनराभ्यासाचा कालावधी देतात. त्यानंतर त्या धड्यावर आधारित १० गुणांची लेखी चाचणी घेतात.
प्रथम सत्रात त्यांनी अशा पाच चाचण्या घेतल्या असून, प्रत्येकीतून प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य देऊन वर्गात सन्मानित केले आहे. हे बक्षिस देताना कोणताही दिखावा न करता, त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी एक सुंदर संस्कार निर्माण केला आहे.
विद्यार्थी चाचणीत गैरहजर राहिल्यास किंवा गुणांकन घटल्यास ते थेट पालकांशी संवाद साधतात. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत ते कोणतीही तडजोड करत नाहीत. शाळेतील इतर गोंधळ किंवा राजकारणापासून ते नेहमीच अलिप्त राहतात आणि शिक्षण हेच साध्य मानतात.
अध्यापनासोबतच नवोदय प्रवेश परीक्षेचे सराव वर्ग घेऊन अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून दिला आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक जबाबदारीही त्यांनी तितक्याच प्रामाणिकपणे निभावली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अमळनेर तहसील निवडणूक विभागाकडून त्यांच्यावर बीएलओची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. शाळा सुटल्यानंतर गावोगावी जाऊन मतदार नोंदणीचे उत्कृष्ठ कार्य त्यांनी केले असून प्रांताधिकारी अमळनेर यांनी त्यांचा “आदर्श बीएलओ” म्हणून सन्मान केला आहे.
त्यांचे लहान बंधू राजेशकुमार टाक (MSW) हेही अमळनेर पंचायत समितीमध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून पारदर्शक सेवा बजावत आहेत.
जळगाव जिल्हा शिक्षक परिषदेने “आदर्श शिक्षक” म्हणून दिनेशकुमार टाक यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच शिक्षकाचे यश पाहणारे, पारदर्शकता, निष्ठा आणि कामपिपासूपणाचे प्रतीक असलेले दिनेशकुमार टाक सर हे खऱ्या अर्थाने “गुरु” या शब्दाला सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्त्व आहेत. कळमसरे ता.अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी सरपंच जी.टी टाक यांचे ते चिरंजीव आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *