अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती
1 min read

अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती

Loading

 

अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती

मुंबई :
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या शिष्टमंडळाने अलीकडेच सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये नवनियुक्त अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी, उपाध्यक्ष श्री. करुणाकर शेट्टी, श्री. संजय सोनवणे, श्री. शंकर शिंदे, श्री. श्रीकृष्ण परब, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. ओमप्रकाश अग्रवाल आणि अमळनेरचे युवा उद्योजक वेदांशू पाटील यांचा समावेश होता.

या भेटीत महाराष्ट्र चेंबरच्या शंभर वर्षपूर्तीच्या ऐतिहासिक सोहळ्याबाबत तसेच व्यापारी व दुकानदारांना २४ तास दुकाने सुरू ठेवण्याच्या परवानगीबाबत सविस्तर चर्चा झाली. शिष्टमंडळाने शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आणि शतकपूर्ती सोहळा महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांनी संयुक्तपणे आयोजित करावा, अशी विनंती केली.

या प्रसंगी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्र चेंबरच्या कार्याला शासनाचा सर्वतोपरी पाठिंबा राहील, असे आश्वासन दिले.

या ऐतिहासिक भेटीत अमळनेरचे युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची उपस्थिती विशेष ठरली. महाराष्ट्र चेंबरच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये आजवरचा सर्वात युवा सदस्य म्हणून वेदांशू पाटील हे ओळखले जातात. अमळनेर शहराच्या औद्योगिक विकासासाठी, विशेषतः नवीन MIDC उभारणी आणि स्थानिक पातळीवर नवे उद्योग आणण्याच्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, अशी त्यांची भूमिका यावेळी त्यांनी स्पष्ट केली तसेच यासाठी वेळोवेळी उद्योग मंत्रांकडे महाराष्ट्र चेंबर तर्फे पत्रव्यवहार देखील केला गेला आहे.

📌 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची माहिती
सन १९२७ साली शेठ वालचंद हिराचंद यांच्यासारख्या द्रष्ट्या उद्योजकांच्या पुढाकारातून स्थापन झालेली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर ही संस्था आज राज्यातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था आहे.
गेल्या ९८ वर्षांत चेंबरने उद्योग, व्यापार, शेती, निर्यात, आयात, रोजगारनिर्मिती आणि धोरणात्मक सल्लामसलत या क्षेत्रांत राज्य शासनासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. महाराष्ट्रातील लघु, मध्यम व मोठे उद्योग यांचे आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ही संस्था करत असून, २०२७ मध्ये या संस्थेचे शतकपूर्ती वर्ष साजरे होणार आहे.

अमळनेरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब असून, महाराष्ट्र चेंबरच्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच या शहरातील एका तरुणाने गव्हर्निंग कौन्सिलमध्ये स्थान मिळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *