“ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व मानसिक आरोग्यावर अमळनेरमध्ये एक दिवसीय चर्चासत्र यशस्वी”
1 min read

“ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व मानसिक आरोग्यावर अमळनेरमध्ये एक दिवसीय चर्चासत्र यशस्वी”

Loading

*ज्येष्ठांच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी धनदाई महाविद्यालयात चर्चासत्र*

अमळनेर प्रतिनिधी:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्येष्ठ नागरिक सामाजिक व मानसिक आरोग्य” या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र नुकतेच पार पडले. मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन नानासाहेब डी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्राचार्य डॉ. एम. एच. पाटील यांनी प्रास्ताविकात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी जागवत, प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या शिकवण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात नानासाहेब डी. डी. पाटील यांनी, “आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आनंदी जीवन जगले पाहिजे,” असे आवाहन केले. याप्रसंगी विचारपीठावर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव एस. एम. पाटील, मा. प्राचार्य डॉ. बी. एस. पाटील जिजाऊ जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष रजनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या सत्राचे मार्गदर्शक माजी प्र-कुलगुरू तथा साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील होते. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात, विद्यापीठाने तरुणांसाठीही चर्चासत्र आयोजित करण्याची विनंती केली. या चर्चासत्रांमध्ये ज्येष्ठांचे महत्त्व, त्यांच्या समस्या आणि शेतीशी संबंधित माहिती दिली जावी, जेणेकरून सर्वांना विद्यापीठाचा सहभाग आपलासा वाटेल, असे ते म्हणाले. त्यांनी ज्येष्ठांसाठी केलेल्या कामांचा आणि त्यांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. दुसऱ्या सत्रात जिजामाता महाविद्यालय, नंदुरबारचे माजी प्राचार्य डॉ. बी. एस. पाटील यांनी, “तरुण वयात केलेल्या चुकांचे परिणाम नंतरच्या आयुष्यात भोगावे लागतात,” असे सांगितले. अमळनेर येथील ज्येष्ठ नागरिक जागृत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पथ्य पाळण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
भोजननंतरच्या तिसऱ्या सत्रात श्री. गोकुळ पाटील यांनी आपल्या जीवनातील उदाहरणे देऊन मानसिक स्वास्थ्य कसे टिकवून ठेवावे, यावर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात “साठोत्तर आनंदी जीवन” या विषयावर बोलताना सौ. रजनीताई पाटील म्हणाल्या की, महिलांना कामातून कधीच सुट्टी नसते. त्यांनी, “झुकू-झुकू चाले वयाची गाडी, विचाराचे गाठोडे हेवेत सोडी, पिकले केस पाहूया, आनंदाने राहूया,” अशी कविता सादर करत छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्याचा सल्ला दिला.
चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बापुसाहेब के. डी. पाटील होते. त्यांनी नवीन पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी ज्येष्ठांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. भगवान भालेराव हे होते तर सूत्रसंचालन प्रा. राहुल इंगळे आणि प्रा. प्रशांत पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. किशोर पाटील, डॉ. लीलाधर पाटील, डॉ. संगीता चंद्राकर, प्रा. मीनाक्षी इंगोले, डॉ. महादेव तोंडे, प्रा. प्रवीण पवार, प्रा. रमेश पावरा, प्रा. जयवंत पाटील, श्री. रवींद्र चौधरी, श्री. कैलास अहिरे, श्री. एस. बी. गिरासे, श्री. दगडू पाटील आणि श्री. राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *