अनाथांची माई सिंधूताईंचा वारसा – ममता सपकाळ यांचे अमळनेरमध्ये हृदयस्पर्शी व्याख्यान , गझल आणि आठवणींनी सजलेले जीवनप्रवासाचे भावनिक प्रतिबिंब
![]()
अनाथांची माई सिंधूताईंचा वारसा – ममता सपकाळ यांचे अमळनेरमध्ये हृदयस्पर्शी व्याख्यान
गझल आणि आठवणींनी सजलेले जीवनप्रवासाचे भावनिक प्रतिबिंब
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर आणि प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित शारदीय व्याख्यानमालेत तिसऱ्या पुष्पाचे मनोहारी सादरीकरण झाले. मराठा मंगल कार्यालयात झालेल्या या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्राला प्रमुख अतिथी म्हणून मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, प्रा. श्याम पवार, भाजपाचे उपाध्यक्ष व मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष भंडारकर, अनुष्का लकी डिजिटल मीडियाचे मंगेश महिंदे व सात्रीचे माजी सरपंच महेंद्र बोरसे उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आदरपूर्वक केला.
समाजसेविका व प्रसिद्ध गझलकार ममता सिंधुताई सपकाळ यांचा परिचय प्रा. शिला पाटील यांनी करून दिला. त्यानंतर “हा खरा जीवन प्रवास” या विषयावर ममताताईंनी आपला प्रेरणादायी आयुष्य प्रवास भावनिक स्वरूपात कथन केला. त्या म्हणाल्या, “अनाथांची माता सिंधूताई सपकाळ यांनी मला घडवले, हीच माझी खरी ओळख आहे. ओळख ही स्वतः निर्माण करावी लागते. माईच्या जीवनातील संघर्षकथा आजही डोळ्यांत पाणी आणतात. अनाथ असल्याची वेदना माईने स्वतः अनुभवली आणि त्या अनुभवातून अनाथांना आधार दिला. माईंचा परमेश्वरावर अपार विश्वास होता; संस्थांचा पाया त्यांच्या श्रद्धा व माणुसकीवर उभा आहे.”
सानेगुरुजी व अजिम प्रेमजींनी अमळनेरला दिलेल्या आठवणींना उजाळा देत ममताताईंनी सांगितले, “जेथे निर्मळ आहे ते अमळनेर आहे.” जीवनप्रवासातील या आठवणींना उजाळा देताना ममताताईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले आणि संपूर्ण सभागृह भावूक झाले.
ममताताईंनी पुढे सांगितले, “माईंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती ही एक गझल होती. अनाथ मुलांच्या डोळ्यांतले अश्रू त्यांनी कवितेत रुपांतरित केले. त्यांचे जीवनच एक गझल आहे. आज मी त्यांच्या आठवणींना गझल स्वरूपात कथन करतेय, कारण हाच त्यांचा खरा वारसा आहे.”
व्याख्यानादरम्यान त्यांनी अनेक गझल आणि शेर सादर केले, ज्यांनी रसिकांच्या अंतःकरणाला स्पर्श केला – “राग अनावर…”, “तुझ्या विना या सहा ऋतुंचं काय करू मी…”, “जे नको होते ते मला घरभर मिळाले…”, “तु सुखाचा चेहरा होतीस आई..तुच होतीस तेव्हा मला मिळाले…”, “सावली नाही जवळ सांगू कुणाला…”, “नको ती सावली, मला ऊन आवडते…”, “पुल आहे जोडणारा का दरी आहे आपल्या बरोबर…” अशा प्रत्येक ओळीत आईविषयीची ओढ, हरवलेपणाची वेदना आणि संघर्षातून जगण्याची ताकद प्रकट झाली.
त्यांनी स्पष्ट केले की आई नसल्याने जीवनात खोल पोकळी निर्माण झाली आहे, पण आईच्या कार्यातून मिळालेलं बळ आजही आधार देते. समाजाविषयी बोलताना ममताताईंनी नमूद केले की आजच्या समाजात मानसिकता झपाट्याने बदलत आहे; प्रत्येकाला बोलायचं आहे, पण ऐकायला कुणी तयार नाही. “येणाऱ्या काळात ऐकण्यासाठी नोकऱ्या निर्माण होतील काय?” हा प्रश्न उपस्थितांना विचारायला लावणारा ठरला. त्यांनी पालकांना केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांनाही घडवले पाहिजे, योग्य संस्कार दिले पाहिजेत, अन्यथा समाजात गंभीर दरी निर्माण होईल, असे ठामपणे सांगितले. तसेच येणाऱ्या काळात सण-उत्सव जिवंत राहावेत यासाठी मुलांना त्यांचे महत्त्व समजावून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ममताताईंच्या या व्याख्यानात सिंधूताईंचा संघर्षमय वारसा, स्वतःचा भावनिक जीवनप्रवास, गझलांचा ठेवा आणि समाजाविषयीची चिंतनशील दृष्टी – या सर्वांचा सुंदर संगम दिसून आला. त्यांच्या डोळ्यातून वाहिलेल्या अश्रूंनी आणि गझलांच्या ओळींनी सभागृहाला एका हृदयस्पर्शी अनुभवाने भारून टाकले
शारदीय व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत,प्रा.शीला पाटील यांनी केले. रसिकांच्या मोठ्या उपस्थितीने आणि काव्यगायनाच्या जादूने अमळनेरची ही काव्यसंध्या संस्मरणीय ठरली.
यावेळी रसीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


