अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास
![]()
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न
वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास
अमळनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील वाकळी येथील सर्वधर्मिय तरुणांनी वडिलोपार्जित परंपरा कायम राखण्यासाठी पावागड (जि. पंचमहल, गुजरात) येथील महाकालिका माता मंदिरामधून अखंड ज्योत आणत सुमारे ४५० कि.मी. चा अनवाणी प्रवास केला. दरम्यान २० रोजी रात्री अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात पोहचल्यानंतर या तरुणांची निवास व भोजनाची व्यवस्था मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आली.
नवरात्र उत्सवाची परंपरा आणि वाकळी गावाचा एकोप्याचा इतिहास हे समिकरण जणू या तरुणांनी अखंड ज्योतच्या माध्यमातून वर्षानुवर्षे कायम तेवत ठेवले आहे. दरवर्षी या गावातील हे तरुण वणीगड, पावागड, माहूरगड, तुळजापूर, इच्छापूर, कोल्हापूर, एकविरा देवी या ठिकाणाहून अनवाणी प्रवास करून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गावात ज्योत आणतात.
यंदा हे तरुण १६ रोजी वाहनाने पावागड येथील महाकालिका माता मंदिरात गेले होते. तेथे १७ रोजी पोहचून मातेचे दर्शन घेऊन ते १८ रोजी अखंड ज्योत घेऊन अनवाणी प्रवासाला निघाले. अनेक अडचणींवर मात करुन हे तरुण २२ रोजी अर्थात घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी गावात पोहचणार आहेत. गावात दाखल होताच ग्रामस्थ वाजतगाजत या तरुणांचे स्वागत करतात. अनेक महिला त्यांचे औक्षण करतात. त्यानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढून ग्रामदैवत मरिमाता मंदिरात ही ज्योत लावली जाते. विशेष म्हणजे या ज्योतीच्या ज्वाला घेऊन गावातील प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते.
यंदा ही परंपरा कायम राखण्यासाठी पवन राजपूत, मंगल राजपूत, अजय राजपूत, रितेश भोई, कुणाल भोई, आदित्य भोई, भावराव चांदणे, समाधान चांदणे, विकास भोई, सुनिल कोळी, प्रशांत कोळी, अनिल कोळी, विशाल राजपूत, सागर राजपूत, अजय परदेशी, आकाश राजपूत, मनोज राजपूत, हर्षल राजप्त, अमजद तडवी, प्रकाश परदेशी, समिर तडवी, शरद तडवी, सोन् लोहार, आसिफ तडवी, गजानन जोशी, धनराज जोशी, करण जोशी, हर्षल भोई, राहुल कोरडे, करण कोरडे, शंकर मोची, रवींद्र म्हस्के आदी तरुणांनी पावागढ ते वाकळी अनवाणी प्रवास केला.
मंगळग्रह सेवा संस्थेचे औदार्य
सदर तरुण हे अनवाणी बाकळीकडे जात असल्याचे समजल्यावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी या तरुणांचे मंदिरात बोलावून स्वागत केले. २० रोजी रात्री सर्व तरुणांची निवास व भोजनाची संस्थेतर्फे व्यवस्था करुन दिली. या तरुणांनी आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ज्योतीतील एक ज्योत श्री मंगळ ग्रह मंदिरात दरवर्षी साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी विधिपुरक काढण्यात आली हीच ज्योत आता संपूर्ण नवरात्र अखंड ज्योत म्हणून मंदिरात राहील. २१ रोजी हे तरुण पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

