“टीईटी प्रश्नावर निर्णायक चर्चा – प्राथमिक शिक्षक भारतीची बैठक मुंबईत संपन्न”
![]()
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे संपन्न*
दिनांक 14/09/2025 रोजी आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली.
जळगांव प्रतिनिधी
या बैठकीमध्ये टीईटी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून राज्य शासनास स्वतंत्र आदेश निर्गमित होत नाही आणि राज्य शासनाकडून या संदर्भात भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आंदोलन अथवा संघटनेच्या वतीने पुर्नयाचिका दाखल करणे संदर्भात कोणताही घाईघाईने निर्णय न घेण्याचे सर्वानुमते ठरले.
शिक्षक भारती संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय श्री. भूषण गवई यांना पत्र लिहून टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केल्याचा उल्लेखही करण्यात आला.
तत्पूर्वी या संदर्भात माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.
सद्यस्थितीत *जळगाव जिल्ह्यातील जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली झालेल्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्तीचे आदेश देण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे विनंती पत्र मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांना देण्याचे ठरविण्यात आले.*
बैठकीत वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा, जुनी पेन्शन, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत, शिक्षकांना 10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी विविध प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्न मंत्रालयीन स्तरावर सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे ठरले. तसेच प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सर्वांनी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले.
टीईटीच्या प्रश्नाबाबत गरज पडल्यास कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन उभं करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या बैठकीसाठी प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, सरचिटणीस भरत शेलार,कार्याध्यक्ष दिनेश खोसे,कोषाध्यक्ष राज्य कार्यकारणी सदस्य, छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील,कार्याध्यक्ष अजयकुमार पाटील, उपाध्यक्ष रणजीत पाटील,सुशिल पाटील,पदमाकर गोसावी,गोपाल पाटील व राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

