पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी,  अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू..
1 min read

पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी, अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू..

Loading

पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी

अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू..

अमळनेर प्रतिनिधी : “लोकशाहीच्या आकाशाला आधार देणारे अदृश्य खांब म्हणजे पत्रकार. न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यपालिका या तीन स्तंभांसोबत पत्रकारिता हा चौथा व अदृश्य स्तंभ लोकशाहीला बळकट करतो,” असे प्रतिपादन अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर संस्थान व्हॉईस ऑफ मीडिया आयोजित केडर् कॅम्पमध्ये विधान सभा माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनी केले.
ते म्हणाले की, पत्रकार हे फक्त वृत्तलेखक नसून समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. पत्रकाराचे काम म्हणजे जनतेत जागृती निर्माण करणे, समाजात सकारात्मक संस्कार घडवणे आणि लोकशाही जिवंत ठेवणे.
गुजराथी पुढे म्हणाले, “व्याकरण कमी असले तरी चालेल, शब्दशक्ती कमी असली तरी चालेल; पण पत्रकाराकडे देशभक्ती, मानवता आणि आचरणातील प्रामाणिकता असली पाहिजे. अहंकार नव्हे तर सेवाभावाने केलेले कार्य हेच पत्रकाराचे बळ आहे.”
घटनांच्या संदर्भात चार बाबी नेहमी लक्षात ठेवाव्यात – घटना कुठे घडली, का घडली, कोणी घडवली आणि कशी घडली. हाच चौकटीतून सत्य समजून घेण्याचा आणि जनतेपुढे मांडण्याचा पत्रकाराचा खरा कस असतो, असे ते म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “जग बदलले, तंत्रज्ञान बदलले; मग पत्रकारितेलाही बदल स्वीकारावा लागेल. नवीन गोष्टींना विरोध न करता सुधारणा अंगीकारणे ही काळाची गरज आहे. अन्यथा आपण मागे पडू.”
गुजराती म्हणाले की, “‘मी’ हा शब्द पत्रकारितेत नको; ‘आम्ही’ भावनेतून काम झाले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने शासनाकडून फक्त मागण्याऐवजी देण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. पत्रकार हे समाजाला देण्याची प्रेरणा देणारे असावेत.”
ते पुढे म्हणाले, “राजकारण, समाजकारण, प्रशासन यात अनेक त्रुटी असतील; पण पत्रकाराची जबाबदारी म्हणजे नाराजी न दाखवता विधायक भाषावाद निर्माण करणे. विवेक आणि विचारशक्ती वापरून समाजात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी पत्रकारिता आहे.”
या केडर कॅम्पमध्ये गुजराती यांनी पत्रकारांच्या जबाबदाऱ्या, बदलत्या काळातील आव्हाने आणि लोकशाहीतील पत्रकारितेचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

One thought on “पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी, अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू..

  1. अप्रतिम विचार धारा! 🌹🌹🌹👏👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *