API दिपक पाटील यांची यशोगाथा….. *बालमित्र ते API साहेब* ✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी
![]()
API दिपक पाटील यांची यशोगाथा…..
*बालमित्र ते API साहेब*
✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी
सर्वप्रथम माझ्या बाल मित्राला जन्मदिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा !… याप्रसंगी माझ्या बालमित्रांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गिरणा काठावर, निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटसं गाव म्हणजे मांदुर्णे. याच गावात १३ सप्टेंबर १९८२ रोजी आमच्या बालमित्राचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. या लहानशा गावात आम्ही तीन मित्र जे साऱ्या गावाला माहिती होतं की या तिन्ही मित्रांची मैत्री अटुट आहे असे दीपक पाटील, महेश भावसार व मी स्वतः प्रमोद पाटील. आम्ही तिघे मित्र जिल्हा परिषद शाळा मांदुर्णे वर्ग पहिली ते वर्ग चौथी यानंतर माध्यमिक शाळेत वर्ग पाचवी ते वर्ग दहावीपर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय मांदुर्णे या शाळेत सोबतच शिकत होतो. यासोबतच आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे काकासाहेब दगडू पाटील, अरविंद, मधुकर, गोरख ,गौतम ,निसार, सागर, प्रमोद, रावसाहेब, साहेबराव, देविदास, सुपडू, समाधान, योगेश, मोहीन, कारभारी, सुरेश, आरिफ, मुस्तफा, आयुब, दयानंद, गोकुळ, गोपी, साहेबराव ( मयत ), पोपट ( मयत ) असे आम्ही सर्व मित्र होतो.
दीपक, महेश आणि मी आमच्याबद्दल गावकऱ्यांचे मत असे होते कि ही मुले लहानपणापासूनच अत्यंत हुशार, शांत, संयमी आणि गावातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करणारी व कुठलेही व्यसन नसणारी ही त्या काळातली आमची ओळख. आम्ही नियमित शाळेत जायचं एकही दिवस शाळा बुडवायची नाही दीपक हा आमच्या वर्गात नेहमी पहिला यायचा आणि वर्गात तो वर्गमंत्री असायचा आणि माझ्याकडे अभ्यासमंत्री ची जबाबदारी असायची. दीपकला लहानपणापासूनच मित्रांची फार आवड होती म्हणून त्याचा मित्रांचा गोतावळा फारच होता. शाळेच्या मैदानावर क्रिकेट , खो – खो, कबड्डी खेळणे असे अनेक खेळ आम्ही शाळेमध्ये खेळलो आणि तेव्हाची मजा काही औरच होती. शाळेतले दिवस खूपच सुंदर आणि अविस्मरणीय होते. त्यातील त्यावेळेस शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन त्यामुळेच आम्ही आज घडलो आणि आपापल्या क्षेत्रात चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
वर्ग दहावी मध्ये आमचे परीक्षा केंद्र कळवाडी होते. आणि आम्ही मोटरसायकलवर किंवा सायकलीवर परीक्षा द्यायला जायचो. आमचे तिघ मित्रांचे आई-वडील शेतकरी होते आणि शेतकरी कुटुंबातील आम्ही तिघे मित्र शिक्षणाची कास धरून बसलो होतो. दहावीचा निकाल लागला शाळेतून व गावातून प्रथम दीपक पाटील, दुसरा मी आणि आमचा बालमित्र महेश देखील चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. आम्ही तिघही हुशार असलो तरी महेश चे मराठी भाषावर प्रभुत्व होतं आणि ते आजही आहे.
चांगले मार्क्स मिळाल्यामुळे गावात आमच्याबद्दलची शिक्षणाची ओढ आई-वडिलांच्या मनात वाढली आणि शेवटी धुळे येथे महाजन हायस्कूल येथे अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मराठी मिडीयम ची मुलं आणि अचानक विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यामुळे मला अडचणी येत होत्या कसेबसे अकरावी विज्ञान पास झालो आणि मी बारावीला पिलखोड येथे ज्युनिअर कॉलेजला ऍडमिशन घेतले. दीपक मात्र बारावी सायन्सला धुळे येथेच राहिला पण त्याचे मन लागेना आणि त्याला देखील बारावीला चांगले यश आले नाही फक्त ५० % गुण मिळाले आणि मला कला शाखेत ५६ % गुण मिळाले. घरच्यांनी खूप रागावले. आमच्या दोघी मित्रांचा शिक्षणाचा मार्ग वेगवेगळा झाला.
पुढे दीपक ने परिवाराच्या माध्यमातून मामाच्या गावाला म्हणजेच देवळाला बी.एस्सी.ला ऍडमिशन घेतले व ३ वर्षात पुर्ण केले आणि मी चाळीसगावला मोठ्या कॉलेजला बी.ए. पुर्ण केले. महेश ने देखील बी.ए.पूर्ण करून आपला पारंपारिक व्यवसाय किराणा दुकान सांभाळत व्यापार सुरू केला.आता पुढे काय तर त्याने पिलखोड येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी क्लास सुरू केले त्या क्लासला आपल्या आईचे नाव दिले “सुनंदन क्लासेस पिलखोड ” या माध्यमातून दीपक ने अनेक विद्यार्थी घडवले व स्वतःही अभ्यास करत राहिला. दीपक एक हाडाचा शिक्षक, उत्तम वक्ता व एक आदर्श शिक्षक कसा असावा ?….त्याचे उत्तर म्हणजे दीपक पाटील.
याच दीपक ने स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे “स्टडी सर्कल नाशिक ” गाठले आणि त्या स्टडी सर्कल मध्ये अध्यापनाचे कार्य सुरू केले. तेथे दिपकला खूप अनुभव आला. खूप पुस्तकांचे वाचन झाले. दीपकचे विद्यार्थी घडत राहिले पण दीपकला काही यश येत नव्हतं. मग पुढे चालून दीपक ने त्या स्टडी सर्कलबद्दल संपूर्ण माहिती घेतल्यानंतर घरच्यांचं कर्ज, परिवार नेहमी दीपक वर नाराज असायचा की एवढा हुशार मुलगा आणि तुला अजूनही यश मिळत नाही वडिलांच्या डोक्यावर कर्ज झाले होते. पण हार मानेल तो दीपक नाही त्याच्या डोक्यात एक नवीन कल्पना आली आणि त्याने मालेगावला स्टडी सर्कलची फ्रेंचायसी घेतली आणि D. Ed. CET चे क्लास सुरू केले. अवघ्या सहा महिन्यात त्याच्या अत्यंत चांगल्या नियोजनाने, विविध सेमिनारच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शनाने त्याला यश आले आणि त्याने केवळ ६ महिन्यात आपल्या वडिलांचे ८ लाखाचे कर्ज फेडले आणि शेतकरी आई वडील सुखावले आणि यासोबतच त्याने एम पी एस सी ची परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेत त्याला यश मिळाले. माझा मित्र अखेर फौजदार झाला. आम्ही दीपकला प्रेमाने व आदराने आबासाहेब म्हणायला लागलो आणि आजही म्हणतो.
आबासाहेब ची पोस्टिंग महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे ज्याला मायानगरी म्हटले जाते अशा जुहू पोलीस स्टेशनला झाली. आणि तिथे त्याने आपल्या नोकरीला सुरुवात केली. मुंबईला असताना लहानपणी टीव्हीवर फिल्म पाहायचं त्या फिल्ममधील हिरो – हिरोईन ज्यांना कधी बघण्याचं स्वप्न देखील आम्ही पाहिलं नाही अशा अनेक हिरो – हिरोईन ला त्याने जवळून बघितले खूप आनंद वाटे आम्हा मित्रांना दीपकच्या डोळ्यातून आम्ही सर्वांना पाहत होतो. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय, गोविंदा, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन यांना प्रत्यक्ष पाहिले एवढेच नाही तर त्यावेळेस अजय देवगन यांच्या पत्नी काजोल यांच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या होत्या या बांगड्यांचा शोध २४ तासाच्या आत आबासाहेबांनी घेतला आणि नोकरानीला पकडले. आम्हाला जेव्हा हे कळले तर आम्ही आश्चर्यचकितच झालो. आबासाहेब मुंबईला असताना मी सहकुटुंब सहपरिवार मुंबईला फिरण्यासाठी पहिल्यांदाच गेलो आणि आबाने मला तीन दिवस मुंबई दर्शन घडवून आणले. जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, विविध हीरो हीरोइन चे बंगले असे अनेक मुंबईचे प्रसिद्ध ठिकाण त्यांनी आम्हाला दाखवले. मुंबईमध्येच आबाची विविध पोलीस स्टेशनला बदली झाली पहिले जुहू पोलीस स्टेशन, नंतर दादर व बांद्रा या ठिकाणी प्रामाणिकपणे आबासाहेबांनी सेवा दिली.
पोलीस क्षेत्र असलं की बदली होणारच म्हणून आबासाहेबांची बदली मुंबईहून भंडारा जिल्ह्यात झाली आणि पालांदूर पोलीस स्टेशन मिळाले. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा हा मतदार संघ. आबासाहेबांनी पालांदूरला देखील आपल्या कामाची छाप सोडली आपल्या सहकाऱ्यांसोबत अतिशय प्रेमाने त्यांनी एक कुटुंब निर्माण केले होते आणि याचसोबत पालांदूर मधील युवक – युवतींसाठी त्यांनी अभ्यासिका निर्माण केली, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले, ग्राउंड ची तयारी करून घेतली आणि त्या पालांदूर मध्ये अनेक विद्यार्थी घडवून अधिकारी करण्यामध्ये आबासाहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आजही पालांदूरचे लोक आबासाहेबांना विसरले नाही. जेव्हा आबासाहेबांची भंडारा जिल्ह्यातच पालांदूर सोडून “गोबरवाही पोलीस स्टेशन ” येथे बदली झाली तेव्हा अक्षरशा: त्या ग्रामस्थ, सहकारी स्टाफ व तेथील युवक – युवतींच्या डोळ्यात अश्रू मावेना. एखाद्या अधिकाऱ्याची बदली होते आणि तेथील लोक अक्षरशा: रडतात असा अधिकारी होणे नाही. मी तरी माझ्या आयुष्यात प्रथम असे पाहिले होते आजही अंगावर काटा येतो असे ते दृश्य होतं.
आबासाहेबांनी पुन्हा गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये याच पद्धतीने आपल्या कामाची छाप सोडली तेथे देखील मुलांना युवकांना स्पर्धा परीक्षेची जाणीव करून त्यांना अभ्यासिका निर्माण करून दिली. गोळा फेकणे, परीक्षेची तयारी करणे, दोरी चढणे, पुलप्स मारणे अशी ग्राउंड चे नियम देखील त्या विद्यार्थ्यांना सांगुन दिशा देण्याचं काम आबासाहेबांनी केले. हे करत असताना आबासाहेबांनी आपल्या गावाशी कधीही नाळ तुटू दिली नाही.
आपल्या पंचक्रोशी मध्ये पिलखोड येथे सर्वप्रथम अभ्यासिका सुरू केली. माझ्या गावातील व परिसरातील मुलांनीही उंच भरारी घ्यावी हे स्वप्न उराशी ठेवून आबासाहेबांनी पिलखोड मध्ये देखील विद्यार्थी घडवले. यानंतर सायगाव येथे त्यांनी अभ्यासिका सुरू केली त्यासाठी लागणारा खर्च, पुस्तक, फर्निचर वगैरे उपलब्ध करून दिले आणि यानंतर स्वतःच्या गावात मांदुर्णे येथे देखील अभ्यासिका सुरू करून पंचक्रोशीतील विद्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत, घडले पाहिजेत हे स्वप्न बाळगणारा पोलीस अधिकारी म्हणजेच आमचा बालमित्र आबासाहेब. आज पिलखोड, सायगाव, मांदुर्णे या गावांमधून अनेक अधिकारी निर्माण होत आहेत याचे श्रेय आबासाहेबांचेच.
या जगामध्ये स्वतःचा व कुटुंबाचा विचार करणारे अनेक लोक पाहिले पण यामध्ये आमचे आबासाहेब वेगळेच आहेत. जे आपले गाव, परिसर, पंचक्रोशी आणि जिथे ड्युटी करतात तेथील लोकांशी आपसूक प्रेम वाढवणं आणि ज्या – ज्या परिसरात त्यांची बदली झाली त्या – त्या परिसरात स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करून त्या विद्यार्थ्यांना घडविण्यामागे आबासाहेबांचा मोठा वाटा आहे. आबासाहेबांनी पैशाला कधीच महत्त्व दिले नाही फक्त माणसं जोडली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा मोठा मित्रांचा गोतावळा आहे. गावातील सामान्य माणसापासून तर महाराष्ट्रातील अनेक नेते, पोलीस प्रशासनातील पदाधिकारी पर्यंत त्यांचं नेटवर्क जबरदस्त आहे.
आबासाहेबांवर गावाचे असणारे अत्यंत प्रेम, माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे, परिवर्तन घडले पाहिजे यासाठी आबासाहेबांनी गावाची निवडणूक बिनविरोध घडवून आणली आणि सरपंच म्हणून आबासाहेबांच्या मातोश्री सौ.सुनंदा दगडू पाटील यांना गावकऱ्यांनी एकमताने होकार दिला. गावात ग्रामसभा होऊ लागल्या, नवनवीन योजना येऊ लागल्या, हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली, फिल्टर प्लॅन, व्यायाम शाळा, घंटागाडी, ग्रामपंचायत ची नवीन इमारत, गावातील रस्ते, कॉंक्रिटीकरण, सभागृह असे विविध कामे आमदार निधीतून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून करून घेतले. गावात सामाजिक – शैक्षणिक उपक्रम घेतले, प्रबोधन, व्याख्यान, कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय जोपासला. एक आदर्श गाव मांदुर्णे करावे असे आबासाहेबांचे स्वप्न होते आणि ते हळूहळू पूर्ण होईल यात शंका नाही.
पुन्हा अबासाहेबांचे गोबरवाही पोलीस स्टेशन येथून बदली झाली आणि ते नाशिक जिल्ह्यात “देवळा पोलीस स्टेशन ” येथे रुजू झाले. गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा निरोप देताना संपूर्ण स्टाफ गावातील गावकरी युवक – युवती यांनी मोठ्या जल्लोषाने आबासाहेबांचे स्वागत करून त्यांना निरोप दिला. पण डोळ्यात अश्रू गावकऱ्यांचे कायम होते की आपण एका चांगल्या अधिकाऱ्याला मुकलो आहोत पण अधिकारी म्हटलं म्हणजे बदली होणारच म्हणून आबासाहेबांना देखील मोठं काळीज करून बदली स्वीकारावी लागतच होती.
देवळा म्हणजेच मामाच गांव. ज्या देवळ्याला आबासाहेबांनी बी.एस्सी. चे तीन वर्ष कॉलेजमध्ये पूर्ण केले आज त्याच देवळा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक API म्हणून रुजू झाल्याचा फार मोठा आनंद होता. आबासाहेबांचा तत्त्व होतं जेथे गेले तेथे आपल्या कामाची ते छाप सोडत असत. आबासाहेब अत्यंत मेहनती, आपल्या कामाच्या हातोटीने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आपल्या पोलीस स्टेशनमध्ये ते नेहमी करत असत. आबासाहेबांचे वरचे अधिकारी देखील कायम त्यांच्या कार्याचे कौतुक करत असत व पाठ थोपटत असत. आबासाहेबांनी देवळाला असताना पत्रकारांना सन्मानित केले होते तेव्हा एका पत्रकाराने असे म्हटले की, आज पर्यंतचे आयुष्यात आम्हाला कोणीही सन्मानित केले नाही. हे एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांनी आमचा सन्मान केला व आदराने स्नेहभोजन दिले. या एका पत्रकाराच्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या यावरून आबासाहेबांचं कार्य कर्तृत्व आपल्याला लक्षात येतं. शेवटी आबासाहेबांना पोलीस स्टेशन देखील बदलीच्या माध्यमातून सोडावे लागले आणि नुकतेच ते मालेगाव येथील कॅम्प पोलीस स्टेशन येथे रुजू झाले.
गावकऱ्यांना हवा – हवा असणारा अधिकारी मित्र अगदी जवळ आल्याने गावातील सर्वसामान्य माणसापासून गावातील सरपंच, उपसरपंच, पंचक्रोशीतील सरपंच, सदस्य, मित्रपरिवार यांनी आबासाहेबांच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांचा स्वागत – सत्कार केला. आबासाहेबांनी अत्यंत आदराने सर्व जनसामान्यांचा सत्कार स्वीकारत आनंद व्यक्त केला. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन मधील सहकारी स्टाफ सुद्धा आश्चर्यचकित झाला की हा असा – कसा अधिकारी की, याच्या स्वागतासाठी हजारो लोक गर्दी करत आहेत मी म्हटल्याप्रमाणे आबासाहेबांनी आयुष्यात फक्त माणसं जोडली आणि हे माणसांचं प्रेम आतोनात होते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हेच सूत्र आबासाहेबांनी आपल्या आयुष्यात कायम ठेवले आहे.
येत्या १३ सप्टेंबर, २०२५ रोजी आमचे बालमित्र तथा आबासाहेब दीपक पाटील ( API ) हे ४३ वर्ष पूर्ण करून ४४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आबासाहेबांचा लहानपणापासून चा संघर्ष आणि आज मिळालेले यश यातून आपल्याला त्यांची जिद्द, मेहनत, चिकाटी हा गुण लक्षात येतो “कोशिश करने वालो की कभी हार नही होती ” हे सिद्ध होतं.
आबासाहेबांच्या या संघर्षामध्ये त्यांना मोलाची साथ देणाऱ्या आमच्या वहिनीसाहेब सौ. माधुरी दीपक पाटील यांचा देखील मोठा वाटा आहे. आपल्या दोन मुलांना म्हणजेच प्राण व गार्गी यांना चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. अधिकारी असल्यामुळे बदल्या होत राहतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी बदलीच्या माध्यमातून जावे लागते आणि मुलांकडे दुर्लक्ष होते पण आमच्या वहिनींनी कधीही मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आमच्या बालमित्राला आमच्या वहिनींनी मोलाची साथ दिली. आबासाहेब हे कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व आहे.
आबासाहेबांबद्दल काय बोलावं आबासाहेब म्हणजे आमच्या मांदुर्णे गावाचे व पंचक्रोशीतले अनमोल रत्न आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करणारा, शिस्तप्रिय, हाडाचा शिक्षक, संवेदनशील व्यक्तिमत्व, पुस्तकप्रेमी, पर्यावरण प्रेमी, उत्कृष्ट खेळाडू, आदर्श पती, आदर्श मुलगा, आदर्श बाप, आदर्श मित्र, आदर्श शिक्षक यासोबतच अत्यंत हळवा, शांत, संयमी मित्रांवर व गावकऱ्यांवर आणि सहकार्यांवर नेहमी प्रेम करणारा हा अवलिया.
माझ्या बालमित्राला उदंड आयुष्य मिळो हीच निर्मिका चरणी प्रार्थना करतो.
आपलाच बालमित्र,
*▪️पी डी पाटील* ( नानाभाऊ )
मांदुर्णे ( धरणगांव )

