प्रिय शिक्षकांच्या बदलीने भावनिक क्षण; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर
![]()
प्रिय शिक्षकांच्या बदलीने भावनिक क्षण; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतून शिक्षक माधवराव भामरे व शिक्षिका सीमा दाभाडे यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. आपल्या आवडत्या शिक्षक-शिक्षिकेपासून दूर जाण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
सन २०१८ पासून सात वर्षे या शाळेवर कार्यरत असताना भामरे सर व दाभाडे मॅडम यांनी शाळेला आपले घर मानून कार्य केले. मुख्याध्यापक रवींद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या सहकार्याने ओसाड शाळेला हिरवळीचे नंदनवन बनवले. वृक्षलागवड, परसबाग, स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रगती अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण घडविण्याचे कार्य या दोन्ही शिक्षकांनी केले.
कोरोना काळात, दुष्काळातही शिक्षकांनी शाळेत हजेरी लावून झाडांना पाणी दिले, टँकर आणून हिरवाई जपली. विद्यार्थ्यांसाठी भाजीपाला स्वतः पिकवून दिला. शाळेला गतवैभव मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले.
विद्यार्थी-पालक व गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे जुळलेले गुरु-शिष्य व गाव-शाळेचे घट्ट ऋणानुबंध शिक्षकांना निरोप देताना स्पष्टपणे जाणवले. गाव व विद्यार्थ्यांबद्दल असलेली आपुलकी व्यक्त करताना सर- मॅडम यांना गहिवरून आले.
बदली ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी शाळेला दिलेले सात वर्षांचे प्रेम, श्रम व कर्तव्यभावना गावाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हृदयात कायम कोरली गेली आहे. निरोपावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांचे अश्रू थांबता थांबेना.

