भक्तीसंप्रदायातील वारकरी कलावंतांना न्याय मिळावा! , भजन, कीर्तन, सप्ताहातून नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या कलाकारांना अधिक टक्केवारी मिळावी, वारकरी साहित्य परिषदेचे निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी
![]()
भक्तीसंप्रदायातील वारकरी कलावंतांना न्याय मिळावा!
भजन, कीर्तन, सप्ताहातून नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या कलाकारांना अधिक टक्केवारी मिळावी, वारकरी साहित्य परिषदेचे निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी
शिंदखेडा प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेत भक्ती संप्रदायाशी निगडित कलाकारांना मिळणाऱ्या टक्केवारीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषद व धुळे जिल्हा कान्हादेश मंडळामार्फत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर योजनेत जेष्ठ साहित्यिक व कलावंतांना पाच हजार रुपये मानधन मिळते. परंतु सध्या भक्ती संप्रदायाशी संबंधित कलाकारांना केवळ शंभर टक्के इष्टांकापैकी दहा टक्के जागा राखीव आहेत. वारकरी साहित्य परिषदेने मांडलेल्या मागणीनुसार, भजनी मंडळ, कीर्तन सप्ताह, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या वारकरी कलाकारांना या योजनेत अधिक प्रमाणात स्थान द्यावे.
हे निवेदन वारकरी साहित्य परिषद व धुळे जिल्हा कान्हादेश मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यामध्ये जिल्हाध्यक्ष सुधाकर भोकरे, कार्याध्यक्ष सुनील वाघ, उपजिल्हाध्यक्ष हिरामण गवळी, खान्देश विभागीय अध्यक्ष विशाल माळी, जिल्हाध्यक्ष कैलास पवार, कार्याध्यक्ष दिलीप महाराज मांडळकर, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई पवार, शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी यांच्यासह पप्पू शिंदे (बाभुळदे), कोमलसिंग गिरासे, अलानेकर विश्वनाथ पाटील, पुरुषोत्तम गोसावी आदींचा समावेश होता.
वारकरी परिषदेच्या मते, गावोगावी यात्रांमध्ये, कीर्तन, भजन, सप्ताह तसेच धार्मिक कार्यक्रमांत वारकरी कलाकार आपली सेवा स्वयंस्फूर्तीने व निःस्वार्थ भावनेने देतात. मात्र शासनाच्या योजनेत त्यांच्या जागा मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांना अधिक न्याय मिळावा म्हणून या योजनेतील टक्केवारी वाढवावी.
चौकट
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेमध्ये भक्ती संप्रदायाशी निगडित वारकरी कलावंतांची टक्केवारी वाढवावी. यामुळे निस्वार्थ सेवा करणाऱ्या कलाकारांना योग्य न्याय मिळेल व जिल्ह्यातील वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ मिळेल.
ह.भ.प. पांडुरंग माळी
अध्यक्ष – शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषद

