अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अखेर नगरपरिषदेच्या ताब्यात — नागरिकांची मागणी : सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह मोफत द्यावे
1 min read

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अखेर नगरपरिषदेच्या ताब्यात — नागरिकांची मागणी : सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह मोफत द्यावे

Loading

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अखेर नगरपरिषदेच्या ताब्यात — नागरिकांची मागणी : सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह मोफत द्यावे

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचा ताबा मुदत संपल्यानंतरही न सोडल्याने अखेरीस नगरपरिषदेने धडक कारवाई करत नाट्यगृह सील केले आहे. मार्च महिन्यात संपलेला तीन वर्षांचा करार संपुष्टात आल्यानंतरही गौरी सुत प्रतिष्ठानने सभागृह ताब्यात न दिल्याने नगरपरिषदेने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली. मिळकत व्यवस्थापक महेश जोशी, कर निरीक्षक लौकिक समशेर, मनोज सोनार, निलेश संदानशिव, सतीश बडगुजर, संतोष केदारे, गणेश ब्रम्हे आदींनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरात स्वागत होत असून आता नागरिक व कलाकारांच्या वतीने नव्या मागण्या जोर धरत आहेत. शहरातील संगीत, नाट्य, वादन तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम हे बहुतेक वेळा विनातिकीट होत असतात. अशा कार्यक्रमांसाठी सभागृह भाड्याने न घेता मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता पुढे येत आहे.

कलाकार म्हणजे समाजाचा आरसा. त्यांच्यामुळे समाजात अभिरुची वाढते, संस्कृती जिवंत राहते आणि नागरिकांना तणाव विसरून आनंदाचे क्षण लाभतात. परंतु अशा कार्यक्रमांना सभागृह भाड्याचा, ध्वनीव्यवस्थेचा व जाहिरातींचा खर्च मोठा अडसर ठरतो. यासाठी नगरपरिषदेने सार्वजनिक पैशातून उभ्या राहिलेल्या या नाट्यगृहाचे दरवाजे समाजोपयोगी, विनातिकीट कार्यक्रमांसाठी शुल्कमुक्त खुले करावेत, अशी मागणी होत आहे.

नाट्यगृह हे शासनाच्या अनुदानातून आणि नागरिकांच्या करातून उभारलेले असल्याने ते खाजगी मालकीची जागा नसून ‘सार्वजनिक सांस्कृतिक मंदिर’ असल्याचा नागरिकांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे त्याचा लाभ सर्वसामान्यांना सहज व स्वस्तात मिळायला हवा, हे मत आता प्रबळ होत आहे.

नगरपरिषद ही केवळ कर वसूल करणारी संस्था नाही, तर ती नागरिकांच्या जीवनात संस्कार, संस्कृती आणि सौंदर्य रुजवण्याचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कलाकारांच्या कलेचा मान राखून, त्यांना प्रोत्साहन देत नाट्यगृह समाजासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले, तर खऱ्या अर्थाने हे सभागृह संस्कृतीचे मंदिर बनेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

कलाकारांचा सन्मान आणि संस्कृतीचे जतन हेच शहराच्या प्रगतीचे अधिष्ठान असल्याने नगरपरिषदेपुढे ही एक सुवर्णसंधी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *