अनोख्या पद्धतीने साजरा झाला शिक्षक दिन : विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका
1 min read

अनोख्या पद्धतीने साजरा झाला शिक्षक दिन : विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका

Loading

अनोख्या पद्धतीने साजरा झाला शिक्षक दिन : विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि. ०५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे श्री समर्थ क्लासेस मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एका खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून कार्यक्रमाला अनोखे स्वरूप दिले.

या वेळी कु. वेदाली भंगाळे, खुशी पाटील, धनश्री अडागळे, माही, निधी भारंबे, तन्वी वानखेडे, संस्कृती बोडस, वंशिका वानखेडे, पुष्कराज जाधव, धवल वाघ आणि धवल खेडकर या विद्यार्थ्यांनी विविध विषय शिकवून शिक्षकांची भूमिका साकारली. तर कु. अनिकेत येवलेने मुख्याध्यापकाची भूमिका निभावत संपूर्ण क्लासचे व्यवस्थापन कौशल्यपूर्णरीत्या सांभाळले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राधाकृष्णन, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने झाली. क्लासेसच्या संचालिका सौ. ज्योत्स्ना जाधव यांनी विद्यार्थ्यांना फुले दांपत्यांच्या कार्याचा परिचय करून देत सांगितले की, “स्त्री शिक्षण, विधवा व परित्यक्ता महिला तसेच अनाथ मुलांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. त्याकाळातील अडचणींवर मात करून केलेल्या कार्यामुळेच आज महिला समाजाच्या उच्च पदांवर पोहोचल्या आहेत.”
विद्यार्थ्यांनी या प्रसंगी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यात कु. माही चौधरीने आंतरदेशीय पत्र लिहून संचालिका जाधव यांचे पुस्तकी शिक्षणाबरोबर सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल मनोगत व्यक्त केले. तिच्या भावनिक शब्दांनी उपस्थित वातावरण भारावून गेले.
तसेच इतर विद्यार्थ्यांनीही सौ. जाधव यांच्या शिक्षणकौशल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहानग्या तेजस पाटील या दुसरीच्या विद्यार्थ्याने उत्साहाने केले. शेवटी त्यानेच आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
समारोपानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व पटले तसेच शिक्षण ही केवळ नोकरी नसून समाज परिवर्तनाचे कार्य आहे हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *