विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला…
1 min read

विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला…

Loading

विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला…

अमळनेर प्रतिनिधी
परिस्थिती कितीही कठीण असली, गरीबीची जखडलेली वाट असली, तरी जिद्द, परिश्रम आणि ध्येयाची प्रखर जाणीव असेल तर यश नक्की मिळते, याचा जिवंत आदर्श म्हणजे देवगाव-देवळी हायस्कूलचा कर्तबगार माजी विद्यार्थी चेतन आधार महाजन.
चेतनने नुकतीच इंडियन नेव्हीची ४ महिन्यांची कठोर ट्रेनिंग तसेच १५ दिवसांची शिफ्ट ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून शाळेचे, कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशानंतर चेतनने आपल्या प्रेरणादायी प्रवासातील अनुभव सांगण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी देवगाव-देवळी हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक आय.आर. महाजन सर यांची अमळनेर येथे भेट घेतली. यावेळी महाजन सरांनी चेतनचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार केला. या प्रसंगी चेतन भारावून गेला आणि गुरुजनांना वंदन केले.
चेतनचे वडील आधार महाजन भाजीपाल्याचा व्यवसाय करून संसाराचा गाडा हाकतात. बहीण मयुरी अकरावीत शिक्षण घेत आहे, तर आई मोलमजुरी करते. घरात ७५ वर्षीय आजोबांची देखील जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत चेतनने आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत परिश्रम केले आणि यशाची शिखरे गाठली.
चेतनने सांगितले की, ट्रेनिंग दरम्यानचा प्रत्येक क्षण आव्हानात्मक होता, पण त्यातून मिळालेली ऊर्जा आणि अनुभव आयुष्यभर उपयोगी ठरणार आहेत.
महाजन सर म्हणाले, “विद्यार्थ्याने शिक्षकाचा अभिमान वाढवावा हेच खरे गुरुदक्षिणा आहे. देवगाव-देवळी या ग्रामीण भागातून असे अनेक विद्यार्थी पुढे येऊन गावाचे, शाळेचे नाव उज्वल करत आहेत. चेतनचे यश आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”

संघर्ष अभ्यासिका : विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यासपीठ

देवगांव ता.अमळनेर येथील
‘संघर्ष अभ्यासिका’ सुरू असून येथे माजी विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी निमित्ताने कार्यरत आहेत, ते वेळोवेळी इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी झाले असून, यावर्षीदेखील बरेच विद्यार्थी यश मिळवतील, असा विश्वास चेतनने व्यक्त केला.
गावातील ज्येष्ठ विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तसेच अभ्यासक्रमाच्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशाची उत्तम संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात देवगाव येथील महात्मा फुले हायस्कूलचे मोलाचे योगदान आहे.
अभ्यासिकेच्या कार्यासाठी गावातील अनेक मंडळी नेहमीच आर्थिक सहकार्य करत असून, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *