श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज  ,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर
1 min read

श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज ,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर

Loading

श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज

जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर

अमळनेर प्रतिनिधी

येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला मंगळ ग्रह देवाचा जन्मोत्सव साजरा होतो. मात्र यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे असल्याने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा होत आहे. त्याअनुशंगाने २९ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी महाभोमयाग, कलशारोहण व नवकुंडी विशेष शांती झाले. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी केवळ मंदिर परिसरच नव्हे संपूर्ण अमळनेर नगरी भक्तिमय व चैतन्यमय न्हाऊन निघाल्याचे दिसत आहे.
संपूर्ण शहरात स्वयंस्फुर्तीने या महासोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या स्वागताचे शेकडो फलक व स्वागत कमानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठिकठिकाणी लागल्याने शहर मंगलमय झाले आहे. सर्वांच्याच तना-मनात महासोहळ्याची आस लागल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने मंगळ ग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी, मंगल परिवार, विविध सेवाभावी संस्था-संघटना, अनिरुद्ध बापूंची डिझास्टर मॅनेजमेंट टीम , विविध महिला मंडळे, खाटू शाम ग्रुप अमळनेर, रोटरी-लायन्स क्लब, पोलीस पाटील व पत्रकार संघटना आदींसह मंदिराचे सेवेकरी, महासोहळ्याचे निमंत्रक खासदार स्मिताताई वाघ व आमदार अनिल पाटील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली महासोहळा मंगलमय करण्यासाठी अहोरात्र सेवाभावाने सेवारत आहेत.

श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याचे नियोजन असे

भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात श्री मंगळग्रह देवाचा जन्मोत्सव. त्यानिमित्ताने आज २ रोजी पहाटे ४ ते ७ वाजेदरम्यान श्री मंगळ महाविशेष अभिषेक, श्री पंचामृत महाभिषेक, नूतन ध्वजारोहण, ५६ भोगार्पण, श्री मंगळ महाआरती होईल. यासोबतच सकाळी ५ वाजता महाआरतीनंतर नित्यनियमानुसार मंगलाभिषेक व मंगळग्रह हवनात्मक शांतीपूजा दिवसभर त्या-त्या बॅचच्या नियोजनानुसार सुरू राहतील. त्यासाठी संपूर्ण तयारी पूर्णत्वास आलेली आहे. भाविकांनी या महासोहळाच्या पवित्र पर्वात दर्शनासह अभिषेक, शांतीपूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने येऊन या महामंगल महायोगाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा सातासमुद्रापार पोहोचवा : अशोकभाऊ जैन

श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा आपल्या सर्वांसाठी खरोखर सुवर्णयोग आहे. या योगाच्या प्रतीक्षेसाठी तब्बल २७ वर्षे लागली आहेत. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी आपली सामूहिक जबाबदारीचे उचित भान राखत हा श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा मंगलमय रित्या यशस्वी करावा आणि तो आपल्या सर्वांच्या माध्यमातून नक्कीच मंगलमय होईल याबाबत मला सार्थ विश्वास आहे. त्यामुळे निश्चितपणे या महासोहळ्याच्या माध्यमातून श्री मंगळग्रह मंदिराचे नाव अर्थात त्यासोबतच अमळनेर नगरी व खानदेशचे नाव सातासमुद्रापार पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असे भावोद्गार महासोहळ्याच्या अंतिम नियोजनाच्या बैठकीत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले. महासोहळ्यासाठी समाजातील सर्वच घटक एकदिलाने याठिकाणी एकवटल्याचे पाहून मी भारावून गेलो आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांचे सर्व सहकारी आणि सेवेकरी यांचा निस्सीम सेवाभाव सार्थ ठरो यासाठी मी श्री मंगळदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी अमळनेरचे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, शरद सोनवणे, प्रवीण गोसावी, तिलोत्तमा पाटील, गणेश भामरे , करुणा सोनार, आदींनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी जैन उद्योग समुहाचे मीडिया व्यवस्थापक अनिल जोशी, माजी नगरसेवक अमर जैन, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील आदींसह मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *