कै. रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन – सचिन रविंद्र चव्हाण यांचा वृक्षारोपण उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी
![]()
कै. रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन – सचिन रविंद्र चव्हाण यांचा वृक्षारोपण उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेरचे सुपुत्र व सध्या चोपडा येथे भारतीय जीवन विमा निगम (LIC of India) मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले सचिन रविंद्र चव्हाण हे विमा क्षेत्रातील अनुभवी व समर्पित अधिकारी म्हणून ओळखले जातात. परंतु, केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजाशी आपली घट्ट नाळ जुळवून ठेवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. “आपण समाजाचे देणे लागतो” या भावनेतून आणि आजोबांप्रती असलेल्या अपार कृतज्ञतेतून त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सचिन चव्हाण यांचे आजोबा कै. रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांनी देवगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये वृक्षारोपणाचा संकल्प केला. या संकल्पाची माहिती त्यांनी शिक्षक व पत्रकार ईश्वर महाजन यांच्याशी बोलतांना व्यक्त केली. “आजोबांच्या नावाने काहीतरी समाजोपयोगी केले पाहिजे” या हेतूने त्यांनी सात निबांची झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारली. झाडे, जाळ्या, बांबू, तार आदी आवश्यक साहित्याकरिता त्यांनी तातडीने आर्थिक सहकार्य करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
शाळेच्या पटांगणात सात निबांची झाडे लावण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर. महाजन, एच.ओ. माळी, एस.के. महाजन, शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरूदास पाटील तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून – “एक मुल – एक झाड ही संकल्पना आपण जगली, तर पुढील पिढ्यांसाठी हिरवेगार भविष्य घडेल,” असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात एक झाड लावून त्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
या उपक्रमाबद्दल विद्यार्थीही भारावून गेले. एका विद्यार्थ्याने आपली भावना व्यक्त करताना सांगितले – “आजोबांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा हा मार्ग पाहून आम्हालाही आपल्या प्रिय व्यक्तींसाठी असाच एखादा चांगला उपक्रम करावा असे वाटते.”
सचिन रविंद्र चव्हाण यांचा हा वृक्षारोपण उपक्रम केवळ कुटुंबाच्या स्मृतींना श्रद्धांजली नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. स्मृती जपताना पर्यावरणाची जपणूक करण्याची ही दुहेरी कृतज्ञता त्यांच्या कार्यातून प्रकट झाली आहे.



