माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
![]()
माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)–
आमच्या श्री. गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे व्यवसाय शिक्षण अंतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेसाठी धुळे येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार तथा आदर्श शिक्षक प्रशांत खरे सर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाडू मातीचा वापर करून आकर्षक गणेश मूर्ती कशा साकारायच्या याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण करून बाप्पाची मूर्ती स्वतः घडवण्याचा आनंद लुटला.
प्रशांत खरे सरांनी विविध वस्तूंचा वापर करून मूर्तीवरील बारीक कोरीव काम, प्रमाणबद्धता, सुबकता, माती भिजवणे यांसारख्या अगदी छोट्या पण महत्त्वाच्या क्लृप्त्या विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्याचबरोबर त्यांनी पर्यावरणपूरक मूर्तीचे महत्त्व, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींपासून होणारे प्रदूषण, तसेच पर्यावरणपूरक मखर व सजावटीबाबत अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री. बी. डी. ठाकरे सर यांनी केले. संयोजन श्रीमती एस. आर. पाटील मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन श्री. दिग्विजय देसले सर यांनी केले. शिपाई श्री. जी. टी. पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे कार्यशाळेसाठी मोलाचे योगदान लाभले.
सदर कार्यशाळेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर इन्शुलकर सर व प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती रिना पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षांनी कार्यशाळेचे विशेष कौतुक केले.



