संत हेच देवरूप- मनोहर खोंडे यांचे व्याख्यानात प्रतिपादन”, संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मसाप’चा उपक्रम
![]()
संत हेच देवरूप-
मनोहर खोंडे यांचे व्याख्यानात प्रतिपादन”
संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मसाप’चा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
भारतीय संतांच्या विचारांचा जागर होण्यासाठी हे अभियान निश्चितच फलदायी ठरणार आहे. संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथी पासून याची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार तथा वक्ते मनोहर खोंडे यांनी केले. येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियानांतर्गत झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. “संत सेना महाराज यांचे जीवन कार्य” या विषयावर श्री.खोंडे यांनी प्रथम पुष्प गुंफले. येथील संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘मसाप’चे अध्यक्ष संदिप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते. नाभिक समाज पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास सैंदाणे, सचिव दिपक खोंडे, नंदुरबार नाभिक मंडळाचे जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, ‘मसाप’चे निमंत्रित सदस्य कवी प्रा बी एन चौधरी, नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्ष भारती सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज, शूरवीर जीवा महाले, शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन वंदना करण्यात आली. श्री खोंडे यांनी सांगितले की, सेना महाराजांनी कर्मयोगातून संत पद मिळवले होते. ते केवळ 50 वर्ष जीवन जगले मात्र त्यांनी पुढील 50 पिढ्यांसाठी आपल्या संत विचाराची शिदोरी सर्वासाठी दिली आहे. त्यांनी मराठीत सुमारे 268 अभंग रचले आहेत. संत हे कुण्या एका समाजाचे नसतात. ते सर्वसमभावाचा संदेश देत सर्व समाजांचे झालेले असतात. संत हेच देवरुप असल्याचे त्यांनी सांगितले. समाज बांधवांना उद्देशून त्यांनी सांगितले की, नाभितून निर्मिती झाल्यामुळे नाभिक समाज निर्माण झाला. या समाजाचे गोत्र कौटिल्य असून जन्माने वैद्य असलेला हा समाज कर्माने केशकर्तक झाला आहे. त्यामुळे प्रत्येक समाज बांधवांनी याचा अभिमान बाळगला पाहिजे. नाभिक समाजाने नेहमीच सेवाभाव जोपासला आहे. संदिप घोरपडे यांनी सांगितले की,संताचे विचार हेच अक्षय साहित्य असून ते नव्यापिढीपर्यत पोहोचावे यासाठी दर महिन्याच्या एकादशीला एका संताचे विचार पोचविले जाणार आहेत. संताचे हे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे जागर अभियान राबविले जात आहे. हा उपक्रम वर्षभर जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मसाप’ चे कोषाध्यक्ष उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक यांनी प्रास्ताविक तर शरद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ‘मसाप’ चे उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, सदस्य नरेंद्र निकुंभ, गोकुळ बागूल, मनोहर नेरकर, निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख, सतिलाल बोरसे, रवी फुलपगारे व नाभिक समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——
अमळनेर – व्याख्यानात प्रथम पुष्प गुंफतांना मनोहर खोंडे. शेजारी संदीप घोरपडे व पदाधिकारी


वाह वाह! अतिशय स्तुत्य उपक्रम संत साहित्याचा जागर करणाऱ्या सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ सारस्वत बंधू भगिनींना हृदयापासून प्रणाम!🌹🌹🌹👏👏👏👏
✒️-हिरामण सोनवणे
(जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धुळे जिल्हा )